कर्नाटकात सध्या इंडियन प्रिमियर लीगप्रमाणे (आयपीएल) इंडियन पॉलिटिकल लीगचा खेळ रंगला असून खेळाडूंच्या बोलीप्रमाणे येथे आता आमदारांची बोली लागण्याची शक्यता आहे, अशा शब्दांत भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा कर्नाटकातील सत्ता स्थापनेतील पेचप्रसंगावर भाष्य केले. कर्नाटकातील राज्यापालांच्या निर्णयाविरोधात त्यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनाबाहेर या प्रकाराच्या निषेधासाठी धरणे आंदोलन केले यावेळी ते बोलत होते.

सिन्हा म्हणाले, कर्नाटकात भाजपाकडे बहुमत नसतानाही राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. उलट काँग्रेस-जेडीएसकडे बहुमत असतानाही त्यांना नाकारण्यात आले, अशा प्रकारच्या असंविधानिक पावले उचलली गेल्याने लोकशाहीची हत्या झाली आहे. देशाच्या राजकीय व्यवस्थेची हीच कमजोरी आहे की, अशा राजकीय परिस्थितीत ते न्याय देण्यास असमर्थ ठरतात.

तत्पूर्वी सिन्हा यांनी ट्विट केले होते की, कर्नाटकातील घटनाक्रम हा २०१९च्या लोकसभा निवडणुकांनंतर दिल्लीत होणाऱ्या संभाव्य घडामोडींचा पूर्वाभ्यास आहे. ते म्हणाले, भाजापकडे बहुमतासाठी ८ आमदार कमी आहेत. आता ते बहुमतासाठी आवश्यक संख्या कुठून गोळा करणार? राज्यपालांकडून संविधानिक नियमाप्रमाणे निर्णयाची जी अपेक्षा होती त्याचा नेमका उलटा निर्णय त्यांनी दिला आहे. क्रिकेटमधील आयपीएलप्रमाणे राज्यपालांच्या निर्णयामुळे कर्नाटकात इंडियन पॉलिटिकल लीग तयार झाली असून येथे आता आमदारांची बोली लागेल. ही बाब लोकशाहीची हत्या आहे. राज्यपाल जर पक्षांसाठी रक्षकाचे काम करायला लागले तर लोकशाही काम करु शकणार नाही.

भाजपाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या रुपात शपथ घेतली. सुप्रीम कोर्टाने काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी करताना येडियुरप्पांचा शपथविधी रोखता येणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतर त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली.