आयपीएलच्या सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याची कबुली राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा मुंबईचा गोलंदाज अंकित चव्हाण याने दिल्ली पोलिसांपुढे दिलीये. अंकितला दिल्ली पोलिसांनी गुरुवारी पहाटे मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमधून अटक केली होती. त्यानंतर त्याच्यासह स्पॉट फिक्सिंगमधील अन्य दोन आरोपी एस. श्रीशांत आणि अंजित चंडिला यांना विमानाने दिल्लीला नेण्यात आले.
न्यायालयाने या तिन्ही खेळाडूंना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारपासून या तिघांच्या चौकशीला सुरुवात केली. पोलिसांनी अंकितला त्याचे क्रिकेट करिअर आता संपुष्टात आले असल्याचे सांगितल्यावर तो ढसाढसा रडू लागला. फिक्सिंगच्या ऑफर मला येत होत्या. सुरुवातीला मी या ऑफर्सना स्पष्टपणे नकार दिला होता. मात्र, नंतर सातत्याने ऑफर येऊ लागल्यामुळे मी त्याला बळी पडल्याचे त्यांने पोलिसांना सांगितले.