स्पॉट फिक्सिंगसाठी सट्टेबाजांनी श्रीशांतला दिलेले साडेपाच लाख रुपये दिल्ली पोलिसांनी मुंबईतून जप्त केले. सट्टेबाजांनी स्पॉट फिक्सिंगसाठी श्रीशांतला दहा लाख रुपये दिले होते. त्यापैकी साडेपाच लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या अभिषेक शुक्ला याला दिल्ली पोलिसांचे पथक बुधवारी मुंबईला घेऊन आले होते. त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी ही रक्कम जप्त केली. श्रीशांत याला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर शुक्ला याने श्रीशांतसाठी असलेली ही रक्कम लपवून ठेवली होती.
सट्टेबाजांनी स्पॉट फिक्सिंगसाठी श्रीशांतला दिलेल्या दहा लाख रुपयांचा हिशोब जुळला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दहा लाखांपैकी ३.७५ लाख रुपयांची रक्कम श्रीशांतने वेगवेगळ्या खरेदीवर आणि पार्टीवर उधळली होती. मुंबई पोलिसांनी अगोदरच ७५ हजार रुपये जप्त केले होते. उर्वरित साडेपाच लाख रुपये दिल्ली पोलिसांनी जप्त केले.
शुक्ला याच्यावर पुरावे नष्ट करण्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. त्याच्यावर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.