आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीत हवाल्याचा पैसा आणि दहशतवाद्यांचा हात असल्यामुळे देशाच्या सुरक्षेलाच धोका निर्माण झाल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरिय समितीने आपल्या अहवालात काढला आहे. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगची विशेष तपास पथक किंवा संयुक्त तपास पथकाकडून सखोल चौकशी करण्याची शिफारसही या समितीने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.
आयपीएल फिक्सिंग: गुरुनाथ मयप्पनवर ठपका, राज कुंद्रांच्या चौकशीची गरज
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मुकुल मुदगल यांच्या नेतृत्त्वाखाली त्रिसदस्यीय समितीने आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आपला अहवाल सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. या अहवालात समितीने स्पॉट फिक्सिंगच्या संपूर्ण प्रकाराविरुद्ध सखोल तपास करण्याची शिफारस केली. सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाची किंवा संयुक्त तपास पथकाची नियुक्ती करावी आणि त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास करावा. संयुक्त तपास पथकामध्ये प्राप्तिकर, महसूल गुप्तचर यंत्रणा, अंमलबजावणी संचालनालय यातील अधिकाऱयांचा समावेश असावा, असे समितीने सुचविले आहे. संयुक्त तपास पथकामध्ये केंद्रीय अन्वेषण विभाग किंवा राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी मध्यवर्ती भूमिका बजावू शकतात. स्पॉट फिक्सिंगसंदर्भात उपलब्ध सर्व माहितीची विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जाऊ शकते आणि निर्धारित वेळेमध्ये हे पथक आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सादर करू शकेल, असे समितीने म्हटले आहे.