तस्करी आणि इतर समाजविघातक कारवायांमध्ये सहभाग असलेल्या काँग्रेस आमदाराच्या वडिलांविरोधातील जुन्या गुन्ह्य़ाचे प्रकरण पुन्हा उघडून नव्याने तपास करू इच्छिणाऱ्या पोलीस अधीक्षकाची तातडीने बदली केल्याची घटना राजस्थानमधील जैसलमेर येथे घडली. राजकीय दबावामुळे पोलीस अधिकाऱ्याची बदली केल्याच्या निषेधार्थ शहरातील नागरिकांनी उत्फूर्त बंद पाळून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.
जैसलमेरचे पोलीस अधीक्षक पंकज चौधरी यांनी पोखरण येथील काँग्रेसचे आमदार सालेह मोहम्मद यांचे वडील गाझी फकिर यांच्याविरोधातील गुन्ह्य़ाचा तपास ३१ जुलै रोजी नव्याने सुरू केला. मात्र त्यानंतर लगेचच २ ऑगस्ट रोजी त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. अचानक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीचे तीव्र पडसाद शहरात उमटले आणि शहरातील व्यावसायिक, हॉटेल, सहलींचे आयोजन करणाऱ्या कंपन्या आदींनी रविवारी काम बंद आंदोलन करून अशोक गेहलोत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. तसेच अधिकाऱ्याचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी केली.
राजस्थानचे मुख्य सचिव सी. के. मॅथ्यू यांच्याकडे विचारणा केली असता राज्याच्या गृहविभागाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून याबाबत आपल्याला अधिक माहिती नसल्याचे सांगितले.