भारताचे सक्तवसुली संचालनालय जागतिक पातळीवर हवाला टोळ्यांची चौकशी करीत असून त्यात दाऊदचा साथीदार दिवंगत इक्बाल मिर्ची याच्या हवाला व्यवहारांची चौकशी चालू आहे. त्यात ब्रिटनला विनंतीपत्र सादर करण्यात आले आहे. इक्बाल मिर्ची याची मालमत्ता, त्याचे साथीदार, त्याची बँक खाती यांची माहिती मिळवण्यासाठी हे विनंतीपत्र राजनैतिक पातळीवर पाठवण्यात आळे आहे.
इक्बाल मिर्ची हा हवाला मार्गाने पैशांची देवाणघेवाण करीत होता. केंद्रीय संस्थांना प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ब्रिटनला विनंतीपत्र पाठवण्याबाबत केंद्रीय अर्थ व गृह मंत्रालयाला परवानगी विचारली होती. ब्रिटनशिवाय संयुक्त अरब अमिराती, स्पेन, सायप्रस, तुर्की व मोरोक्को या देशांकडेही संपर्क साधण्यात आला आहे. सक्त वसुली संचालनालयाने तीन हजार कोटींच्या निधीची चौकशी सुरू केली आहे. त्यात इक्बाल मिर्ची याच्या दोन मुलांना व विधवा पत्नीला नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. परकीय चलन कायदा नियंत्रण कायद्यानुसारही त्यांची चौकशी सुरू आहे. त्याचे वकील, व्यावसायिक भागीदार व नातेवाईक यांचीही चौकशी चालू आहे.
मुंबईत वरळी सी फेस भागात त्याच्या ६१३२ चौरस मीटर आकाराच्या चार इमारती होत्या त्या त्याने बनावट नाव धारण करून २०१० मध्ये विकल्या. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर या इमारती बेनामी असल्याचे सांगून सील करण्यात आल्या. भारताने इक्बाल मिर्ची याच्या विरोधात १९९४ मध्ये इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. दुबई, ब्रिटन, टर्की येथे त्याची व्यापारी आस्थापने आहेत. बराच पैसा दाऊदला मिळाल्याचे सांगण्यात येते.
दहाहून अधिक देशांत मालमत्ता
इक्बाल मिर्ची २०१३ मध्ये ब्रिटनमध्ये असताना मरण पावला असून त्याने हवालामार्गे पैसे आणून १० किंवा अधिक देशात मालमत्ता विकत घेतल्या होत्या. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखा, बृहन्मुंबई महापालिका व महाराष्ट्र जमीन नोंदी अधिकाऱ्यांचेही सहकार्य यात घेतले जात आहे. मिर्ची याच्या एकूण ५० मालमत्ता असून २० बँक खाती आहेत. मुंबईत त्याच्या पाच मालमत्ता होत्या त्या विकून त्याने परदेशात किमती वास्तू विकत घेतल्या होत्या. त्यातील काही पैसा डी गँगने (दाऊद टोळी) वापरल्याचे समजते.