आण्विक धोरणात बदल करण्याची तयारी इराणने दाखवली आहे. इराण, अमेरिका, चीन, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या सात देशांमध्ये तडजोड झाल्यामुळे अमेरिका-इराण युद्धाचे संकट टळले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्ताला अधिकृतरित्या दुजोरा दिला आहे.  ई ३ प्लस ३ आणि इराण यांच्यात तडजोडीचा निर्णय घेण्यात आला आहे, असे एश्टनचे प्रवक्ता मायकल मान यांनी ट्विट केले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्यासह चीन, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणशी शनिवारी सविस्तर चर्चा केली. चर्चेची ही फेरी यशस्वी झाली. इराणने आपल्या आण्विक धोरणात बदल करण्याची तयारी दाखवली आहे. या बदल्यात इराणवरील काही निर्बंध मागे घेण्याची तयारी अमेरिका, चीन, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी दाखवली आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी तडजोडीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.  या तडजोडीनंतर इराणच्या आण्विक कार्यक्रमाची पाहणी होऊ शकते, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. जर इराणने तडजोडीचे पालन केले तर त्याच्यावर सहा महिने कोणताही निर्बंध लावला जाणार नाही, असे अमेरिकेच्या प्रशासनाने एका व्यक्तव्यात म्हटले आहे.