युक्रेनच्या विमानाचा अपघात झाला होता की ते पाडण्यात आलं होतं अशा चर्चांना उधाण आलं होतं. आता या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे विमान चुकून पाडलं असल्याची कबुली इराणच्या लष्करानं दिली आहे. यामध्ये १७६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

युक्रेनच्या विमान अपघाताबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही एक मानवी चुक होती. हे विमान क्षेपणास्त्र हल्ल्यात चुकून पाडलं, अशी कबुली इराणी लष्करानं दिली आहे. इराणच्या सरकारी माध्यमानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. युक्रेनचे जे विमान बुधवारी अपघातग्रस्त झाले ते प्रत्यक्षात इराणने पाडल्याची गुप्तचर माहिती हाती आली असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडू यांनी सांगितलं होतं. हे विमान तेहरान येथील विमानतळावरून उडाल्यानंतर कोसळलं होतं. या अपघातात १७६ जण ठार झाले, त्यात कॅनडाच्या ६३ नागरिकांचा समावेश होता.

या अपघाताची एक चित्रफित हाती आली होती. हे विमान पाडण्यात आल्याचे त्यातून सूचित झाले आहे त्या आधारे थ्रुडू यांनी हा आरोप केला होता. या अपघाताची आणखी एक चित्रफीत समाजमाध्यमांवर टाकण्यात आली होती. त्यात तेहरानच्या हवाई सुरक्षा बॅटरीजच्या मदतीने हे विमान पाडण्यात आल्याचे दिसून आले होतं. हा प्रकार कुठल्या हेतूने झालेला नसू शकतो, पण कॅनडातील लोकांना काही प्रश्न आहेत व त्यांची उत्तरं मिळाली पाहिजेत, असंही ते म्हणाले होते.

थ्रुडू यांच्या आरोपाला पाश्चिमात्य नेत्यांनी पाठिंबा दिला होता. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यातच ते विमान पडले याचे पुरावे आहेत पण त्यात त्यांचा हेतू विमान पाडण्याचा नसावा, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले होते. तर इराणची एक किंवा दोन क्षेपणास्त्रे विमानावर धडकली असावीत. त्यानंतर त्याचा स्फोट झाला, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होतं.