आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे जगाचा रोष ओढवून घेणाऱ्या महमौद अहमदीनिजाद यांचा इराणच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल संपुष्टात आला असून, नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी या देशात मतदानास सुरुवात झाली आहे. सुधारणावादी आणि सनातनी अशा दोन विचारधारांच्या उमेदवारांमध्ये या वेळी थेट सामना होणार आहे.
राष्ट्राध्यक्षपदाच्या मतदानास शुक्रवारी सुरुवात झाली. इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह खाम्नेई यांनी सकाळी प्रारंभीच मतदान केले. इराणमधील नव्या पर्वास या प्रक्रियेमुळे सुरुवात होत असल्याची प्रतिक्रिया खाम्नेई यांनी व्यक्त केली. तसेच इराणच्या नागरिकांनी या निवडणुकीस भरभरून प्रतिसाद द्यावा आणि मोठय़ा संख्येने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
इराणमधील अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल अमेरिकेने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबाबत खाम्नेई यांना विचारले असता, इराणचे नागरिक जे आपल्या हिताचे आहे असे वाटेल तेच करतील, अमेरिका गेली उडत, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
अमेरिकेचे आक्षेप नेमके काय होते?
इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी केवळ सहा उमेदवारांनाच नामांकन अर्ज दाखल करता आले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया आंतरराष्ट्रीय संकेतांचा विचार करता, मुक्त-स्वतंत्र आणि पारदर्शक नाही, असा आक्षेप अमेरिकेने नोंदविला होता.
इराणमधील निवडणूक प्रक्रिया
अध्यक्षीयपदाच्या उमेदवारांची निवड एका गार्डियन कौन्सिलद्वारे केली जाते. मात्र ही कौन्सिल लोकनिर्वाचितही नाही किंवा कोमालाही उत्तरदायीही नाही. इराणच्या नागरिकांनी गार्डियन कौन्सिलतर्फे पात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांपैकी एकास मत देणे अपेक्षित असते.
निवडणुकीत आघाडीवर कोण?
इराणमध्ये सनातनी आणि सुधारणावादी असे दोन गट निर्माण झाले असून, सुधारणावादी गटाच्या हसन रौहानी यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीत लोकभावनेचा लाभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मात्र असे असले तरी, माजी परराष्ट्रमंत्री अली अकबर वेलायती, तेहरानचे महापौर मोहम्मद बकेर क्वालिबॅफ आणि आण्विक वाटाघाटी करणाऱ्यांपैकी प्रमुख नेते सईद जलाली या सनातनी विचारसरणीच्या उमेदवारांना विजयाची संधी असल्याचे सांगितले जात आहे.

मुद्दे आणि वैशिष्टय़े
* सुमारे साडेपाच कोटी मतदार
* आण्विक चाचण्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडल्यानंतरची पहिली अध्यक्षीय निवडणूक
* समृद्ध युरेनियमच्या वापरामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करणे हा प्रचाराचा मुख्य मुद्दा
* लोकांच्या प्रतिसादामुळे मतदान मध्यरात्रीपर्यंत