इराणने अमेरिकेसाठी काम करणाऱ्या १७ हेरांना अटक केली आहे. त्यातील काही जणांना देहदंडाची शिक्षा सुनावली आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. सीआयएने उभारलेले हेरगिरीचे नेटवर्क मोडून काढल्याचा दावा इराणने केला आहे. १७ संशयितांना अटक केली आहे. गुप्तचर मंत्रालयाच्या हवाल्याने सरकारी वाहिनीने हे वृत्त दिले आहे. अटक केलेल्या काही जणांना देहदंडाची शिक्षा सुनावल्याचे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

अटकेत असलेले हेर इराणमधील संवेदनशील आणि महत्वाच्या ठिकाणी कार्यरत होते. आर्थिक, अण्विक, लष्करी आणि सायबर विभागामध्ये त्यांचा वावर होता असे मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे. सीआयएकडून चालवले जाणारे सायबर हेरगिरीचे नेटवर्क उघड केल्याचा दावा जून महिन्यात इराणने केला होता. १७ जणांना झालेली अटक त्याच्याशी संबंधित आहे का? ते अजून स्पष्ट झालेले नाही.

सध्या आखातामध्ये इराण आणि अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे. मागच्याच आठवडयात इराणने होरमुझच्या सामुद्रधुनीतून ब्रिटनचा एक तेल टँकर ताब्यात घेतला. स्टेना इम्पेरो टँकर सौदी अरेबियाच्या बंदराच्या दिशेने चालला होता. होरमुझच्या सामुद्रधुनी पार करताना या टँकरने दिशा बदलली. ब्रिटनने जप्त केलेल्या या जहाजासंबंधी इराणकडून तात्काळ माहिती मागितली आहे. लवकरात लवकर परिस्थिती बदलली नाही तर दूरगामी परिणाम होतील असे ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेरेमी हंट यांनी म्हटले आहे.