अण्वस्त्र कार्यक्रमावरील सर्व बंधने झुगारण्याची भूमिका घेणाऱ्या इराणने आता अमेरिकन सैन्यदलांसंबंधी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमेरिकेने शुक्रवारी पहाटे एअर स्ट्राइकमध्ये टॉप लष्करी कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या केल्यामुळे इराण चांगलचा खवळला आहे. सुलेमानींच्या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार करणारा इराणने केला आहे. शक्य असलेल्या प्रत्येक आघाडीवर इराण अमेरिकेविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे. जनरल कासिम सुलेमानी हे इराणच्या राजकीय वर्तुळातील बडे प्रस्थ होते. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे ते निकटवर्तीय होते.

इराणने काय निर्णय घेतला?
२०१५ मध्ये झालेल्या अण्वस्त्र करारानुसार इंधनाच्या समृद्धीकरणावर निर्बंध होते. त्या निर्बंधांचे पालन न करण्याची भूमिका इराणने घेतली आहे. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर कुठल्याही मर्यादा नाहीत ही हसन रौहानी प्रशासनाची भूमिका इराणच्या सरकारी वाहिनीवरुन जाहीर करण्यात आली.

अमेरिकन सैन्यासंबंधी काय निर्णय घेतला?
अमेरिका आणि इराणचे संबंध धोकादायक पातळीला पोहोचले असून, दोन्ही देशांमध्ये युद्ध सुद्धा भडकू शकते अशी स्थिती आहे. आता इराणने अमेरिकेच्या सर्व सैन्यदलांना दहशतवादी घोषित केले आहे. इराणचे मंत्री मोहम्मद जावाद अझारी जाहरोमी यांनी ट्रम्प यांना ‘सूटातला दहशतवादी’ म्हटले आहे.