News Flash

चीनसोबत मेगा डीलनंतर इराणचा भारताला झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

इराणमध्ये भारतावर चीनची कडी; ढिलाईमुळे गेला हातचा प्रकल्प

संग्रहित (PTI)

इराणने भारताला मोठा झटका दिला आहे. चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासाठी करार करण्यात आल्यानंतर चार वर्षांनी इराणने भारताला या प्रकल्पातून बाहेर काढलं आहे. अफगाणिस्तान सीमारेषेलगत हा रेल्वे मार्ग उभारला जाणार होता. भारताकडून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी तसंच निधी मिळण्यास विलंब होत असल्याचं इराण सरकारने सांगितलं आहे. इराणने आता स्वत:च हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘द हिंदू’ने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

गेल्या आठवड्यात इराणचे वाहतूक आणि शहर विकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांच्या हस्ते ६२८ किमी लांबीच्या चाबहार – जाहेदान रेल्वे मार्ग प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं असून कामास सुरुवात करण्यात आली आहे. हा रेल्वे मार्ग अफगाणिस्तानच्या जारांजपर्यंत जाणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. इराण रेल्वे विभाग भारताच्या कोणत्याही मदतीविना हा प्रकल्प पूर्ण करणार असून यासाठी राष्ट्रीय विकास निधीची वापर करण्यात येणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

यामधील महत्त्वाची घडामोड म्हणजे चीनने इराणसोबत ४० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसाठी करार केला असतानाच हे वृत्त आलं. चीनने पुढील २५ वर्षांसाठी इराणसोबत करार केला आहे. इराण रेल्वे आणि इंडियन रेल्वेज कन्स्ट्रक्शन लिमिटेड (IRCON) यांच्यात या रेल्वे प्रकल्पावरुन चर्चा सुरु होती. हा प्रकल्प भारताच्या अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियात पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यासाठी असणाऱ्या कटिबद्धतेचा तसंच इराण आणि अफगाणिस्तानसोबत असणाऱ्या त्रिपक्षीय कराराचा भाग होता.

मे २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तेहरानच्या दौऱ्यावर होते. यावेळी तेहरानमध्ये इराणचे अध्यक्ष रुहाणी, अफगाणिस्तानचे अध्यक्ष घणी आणि आयआरसीओएन यांच्यात चाबहार रेल्वे मार्गाच्या करारावर स्वाक्षरी केली होती. इराणी रेल्वे मंत्रालयासोबत झालेल्या या रेल्वे मार्गाच्या निर्मितीच्या करारात भारताकडून IRCON सहभाग होता. IRCON ने सर्व सुविधा देण्याचं तसंच निर्मितीमध्ये सहभाग आणि निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं. IRCON ने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 11:03 am

Web Title: iran drops india from chabahar rail project citing delays from in funding sgy 87
Next Stories
1 नवजात मुलीचा जीव वाचवण्यासाठी ब्लड प्लाझ्मा घेऊन चालले होते, पण रस्त्यात कारने धडक दिली आणि….
2 बंगल्यात थोडं आणखीन काही दिवस राहू द्या; प्रियंका गांधींनी खरंच केली का मोदींकडे विनंती?
3 देशभरातील करोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ९ लाखांचा टप्पा
Just Now!
X