इराणनं बुधवारी आक्रमक पवित्रा घेत इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. आपण स्वसंरक्षणासाठी उचललेलं हे पाऊल असल्याचं स्पष्टीकरण यावेळी इराणकडून देण्यात आलं. या हल्लानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद झरीफ यांनी प्रतिक्रिया दिली. यापूर्वी इराणनं जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेणार असल्याचं म्हटलं होतं.

अमेरिकेत आयोजित परिषदेसाठी जाणाऱ्या इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना मंगळवारी व्हिसा नाकारण्यात आला होता. दरम्यान, या हल्ल्यानंतर मोहम्मद जावेद झरीफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यूएन चार्टरच्या आर्टिकल ५१ अंतर्गत इराणनं स्वसंरक्षणासाठी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलं. “अमेरिकेनं आमच्या नागरिकांवर आणि सैनिकांवर भ्याड हल्ला केला होता. युद्ध छेडण्याचा आमचा हेतू नाही, परंतु आक्रमकतेनं आम्ही आमच्या देशाचं संरक्षण करू,” असंही त्यांनी नमूद केलं.

“इराकमधील अमेरिकन लष्कराच्या हवाई तळांवर हल्ला करून आम्ही पहिलं पाऊल टाकलं आहे. आम्ही अमेरिकेच्या सैन्याला सोडणार नाही,” अशी प्रतिक्रिया बुधवारी इराणी सरकारी माध्यमाशी बोलताना इराणच्या कमांडरनं दिली. यापूर्वी अमेरिकनं लष्कर आणि पेटागनला दहशतवागी घोषित करण्याच्या बाजूनं मंगळवारी मतदान करण्यात आलं.

आणखी वाचा – इराणचा अमेरिकेच्या हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला; ३० सैनिक मारल्याचा दावा

ट्रम्प यांनी सैन्य हटवावं
“आज करण्यात आलेला क्षेपणास्त्र हल्ला हे पहिलं पाऊल आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या भागातून आपलं लष्कर माघारी बोलावण्यावर विचार करावा लागेल,” असं ‘इस्लामिक रीव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’कडून (आयआरजीसी) सांगण्यात आलं.