सीरियाबरोबर शांतता प्रस्थापित करण्याच्या परिषदेसाठी संयुक्त राष्ट्रांनी इराणला निमंत्रित केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.  इराणने जीनिव्हातील बैठकीनंतर तयार करण्यात आलेला  संयुक्त जाहीरनामा स्वीकारला नसतानाही त्यांना सीरियातील शांतता बोलणीसाठी निमंत्रित करणे योग्य नाही, असे अमेरिकेचे मत आहे. सीरियातील विरोधी गटांनीही इराण या परिषदेत सहभागी होणार असेल तर,आम्ही माघार घेऊन अनुपस्थित राहू असा इशारा दिला आहे.
घाईने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी सांगितले की, सीरियातील पेचप्रसंग सोडवण्यासाठी इराण महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो यावर आमचा विश्वास आहे, त्यामुळे त्यांना निमंत्रित केले आहे. सीरियातील यादवी संघर्ष संपवण्यासाठी शांतता बोलणी यशस्वी होणे महत्त्वाचे आहे व त्यासाठी अनुकूल वातावरण तयार व्हावे यासाठी इराणला निमंत्रित केले असे समर्थनही त्यांनी केले.