इराणचे टॉप लष्करी जनरल कासीम सुलेमानी यांच्या मृत्यू प्रकरणी इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह आणखी काही जणांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. इराकच्या बगदाद शहरात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी ठार झाले होते. डोनाल्ड ट्रम्प यांना पकडण्यासाठी इराणने इंटरपोलकडे मदत मागितली आहे.

इराण बरोबर झालेल्या अण्वस्त्र करारातून ट्रम्प यांनी एकतर्फी माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. यावर्षी तीन जानेवारी रोजी बगदाद येथे कासीम सुलेमानी यांच्या ताफ्यावर ड्रोनमधून हल्ला करण्यात आला. यामध्ये ट्रम्प यांच्यासह ३० जण सहभागी होते असे अभियोक्ता अली अलकासीमहर यांनी म्हटले आहे. असोसिएटड प्रेसने हे वृत्त दिले आहे.

आयआरएनए वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आरोपींवर हत्या आणि दहशतवादाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. अली अलकासीमहर यांनी ट्रम्प शिवाय कोणाचेही नाव घेतले नाही. ट्रम्प यांची अध्यक्षीपदाची मुदत संपल्यानंतरही त्यांच्याविरोधात खटला सुरुच ठेवणार असल्याचे अली अलकासीमहर यांनी सांगितले.

जनरल सुलेमानी कोण होते?
कासीम सुलेमानी इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड फोर्सचे प्रमुख होते. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये अमेरिकेने इराणच्या या आयआरजीसी फोर्सला दहशतवादी संघटनेचा दर्जा दिला होता. सुलेमानी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी कद्स फोर्स परदेशात इराणसाठी वेगवेगळया गुप्त मोहिमांची अंमलबजावणी करायची.

सुलेमानी यांच्याकडे १९९८ सालापासून कद्स फोर्सचे नेतृत्व होते. गुप्त माहिती गोळा करण्याबरोबरच कद्स फोर्स परदेशात लष्करीमोहिमा पार पाडते. त्याशिवाय सुलेमानी हे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. इराणचे भविष्यातील नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.