कासीम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत १० लाखांची गर्दी

अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झालेले इराणचे मेजर जनरल कासीम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत मंगळवारी दहा लाख लोक सहभागी झाले. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ५० ठार तर १९० जण जखमी झाले.

सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत मंगळवारी मोठी गर्दी झाली होते. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने भीषण चेंगराचेंगरी होऊन ५० जणांना प्राण गमवावे लागले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती इराणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गर्दी आणि चेंगराचेंगरीमुळे दफनविधीही विलंबाने झाला. त्याआधी तेहरान, कोम, माशाद आणि अहवाझ येथे हजारो लोकांनी एकत्र जमून सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहिली.

अमेरिकेने बगदाद विमानतळावर शुक्रवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी ठार झाले.

त्यामुळे इराण व अमेरिका यांच्यात तणाव वाढला. सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेतल्यास इराणमधील ५२ ठिकाणांवर हल्ले करू, असा इशारा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. यामुळे या दोन देशांतील संघर्ष तीव्र होण्याचे संकेत आहेत.