अमेरिकन एअर स्ट्राइकमध्ये कासिम सुलेमानीचा मृत्यू झाल्यानंतर आता इराणकडून बदला घेण्याची भाषा केली जात आहे. अमेरिकेला किंमत चुकवावी लागेल असे इराणने स्पष्ट शब्दात म्हटले आहे.

या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वपूर्ण टि्वट केले आहे. ‘इराण युद्धात कधी जिंकत नाही, पण तो तहातही हरतही नाही’ असे टि्वट ट्रम्प यांनी केले आहे. अप्रत्यक्षपणे त्यांनी युद्धाची भाषा करणाऱ्या इराणला चर्चेचे निमंत्रण दिले आहे.

इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानीच्या मृत्यूनंतर अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये तणाव मोठया प्रमाणावर तणाव वाढला आहे. अमेरिकन एअर स्ट्राइकमध्ये सुलेमानीचा मृत्यू झाला.

इराणने केली प्रतिज्ञा?
कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर आयातुल्ला खोमेनी यांनी काही टि्वटस केले आहेत. सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहताना अमेरिकेला त्यांनी इशारा दिला आहे. “इतकी वर्ष त्यांनी अथक मेहनत घेतली. शहीद होणे हा एक पुरस्कार आहे” असे खोमेनी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. खोमेनी यांनी देशामध्ये तीन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

खोमेनी यांनी शत्रुंना काय इशारा दिला?
“सर्व शत्रुंनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, जिहाद यापुढेही सुरु राहिल आणि त्याला दुप्पट बळ मिळेल, या पवित्र लढाईत निश्चित विजय होईल” असे खोमेनी यांनी सरकारी वाहिनीवरील संदेशात म्हटले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही अमेरिकेवर टीका केली आहे. अमेरिकेने धोकादायक पाऊल उचलले असून त्यांना परिणाम भोगावे लागतील असे त्यांनी म्हटले आहे.

तात्काळ इराक सोडा
अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना तात्काळ इराक सोडण्यास सांगितले आहे. कासिम सुलेमानी इराकचा टॉप कमांडर होता. नागरिकांनी हवाई मार्गेने किंवा ते शक्य नसल्यास रस्ते मार्गाने दुसऱ्या देशात पोहोचावे असे अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे.

सुलेमानीच्या मृत्यूनंतर काही तासांनी अमेरिकन दूतावासाने हे स्टेटमेंट जारी केले आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी थेट अमेरिकेला धमकी दिली आहे. हा अत्यंत गंभीर गुन्हा असून बदला घेण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.