भारताकडून तेल खरेदीत मोठय़ा प्रमाणात कपात करण्यात आल्याने आता इराणची स्थिती नाक दाबले आणि तोंड उघडले अशी झाली आहे, त्या देशाने आता भारताला अनेक आकर्षक ऑफर दिल्या असून त्यात, पाकिस्तानला टाळून सागरी मार्गाने तेलाची पाईपलाईन टाकण्याची तयारी, तेलशुद्धीकरण कारखान्यांना विमा यांचा त्यात समावेश आहे.
इराणचे एक शिष्टमंडळ तेल मंत्री रोस्तम घासेमी यांच्या नेतृत्वाखाली भारतात आले असून त्यांनी भारताने तेल खरेदी वाढवावी यासाठी मनधरणी सुरू केली आहे. गेल्या वर्षी भारताची तेलखरेदी १८ दशलक्ष डॉलर होती ती २०१२-१३ या वर्षांत १३.३ दशलक्ष इतकी खाली आली आहे.
यावर्षी तेलाची आयात ११ दशलक्ष टनांनी कमी होणार आहे कारण मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड ही कंपनी या वेळी तेलाची आयात करणार नाही. २०१२-१३ मध्ये त्यांनी ३९ लाख टन तेलाची आयात केली होती.
इराणचे तेल मंत्री घासेमी यांनी त्यांचे समपदस्थ एम. वीरप्पा मोईली यांची भेट घेतली, त्यात त्यांनी भारताने आणखी तेल खरेदी करावी असा आग्रह केला. भारतीय तेल कंपन्यांना आपण तेल खरेदी करण्यास सांगू, असे आश्वासन भारताच्या वतीने देण्यात आले आहे.
तेल खरेदीसाठी जहाजांची अनुपलब्धता तसेच आयातीसाठी परकीय चलनाची कमतरता यामुळे भारताची तेलखरेदी कमी झाली आहे. पाश्चिमात्य देशांनी इराणवर घातलेल्या र्निबधांमुळे युरोपीय देशांनी पर्शियन आखातातील तेल वापरणाऱ्या तेलशुद्धीकरण कारखान्यांना फेरविमा संरक्षण देण्यास नकार दिला होता. चर्चेच्यावेळी इराणने तेलशुद्धीकरण कारखान्यांना विमा देण्याची तयारी दर्शवली आहे.