नवी दिल्ली : इराणी खनिज तेलाच्या आयातीवर अमेरिकेचे निर्बंध व त्याचे भारतावर परिणाम, इंडो-पॅसिफिक सहकार्य व संरक्षण तंत्रज्ञानाबाबतचे करार हे मुद्दे भारत व अमेरिका यांच्या दरम्यान गुरुवारी येथे होणाऱ्या टू प्लस टू संवादात उपस्थित केले जाणार आहेत.

रशियाकडून एस ४०० ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याच्या ४० हजार कोटींच्या करारास अमेरिकेची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. रशियावर निर्बंध असल्याने त्यांच्याकडून ही प्रणाली खरेदी करू नये असे अमेरिकेचे म्हणणे होते पण नंतर त्यातून भारताला सूट देण्यात आली होती. व्यापारवाढ, दहशतवादाशी मुकाबला, एच १ बी व्हिसातील अन्याय हे मुद्देही उपस्थित केले जाऊ शकतात.

परराष्ट्र मंत्रालयाने यावेळी मांडावयाच्या मुद्दय़ांची चाचपणी केली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन तसेच त्यांचे अमेरिकी समपदस्थ माइक आर पॉम्पिओ व जेम्स मॅटिस यांची गुरुवारी होणारी चर्चा टू प्लस टू संवादाअंतर्गत होत आहे. हा प्रस्ताव गेल्या वर्षीच तयार करण्यात आला, पण यापूर्वी दोनदा ही चर्चा लांबणीवर पडली होती.

अमेरिकी प्रतिनिधी मंडळात ‘यूएस जॉइंट चिफ्स ऑफ स्टाफ जनरल’ हे जोसेफ डनफर्ड यांचाही समावेश आहे. सुषमा स्वराज या माइक पॉम्पिओ यांच्याशी तर निर्मला सीतारामन या जेम्स मॅटिस यांच्याशी गुरुवारी द्विपक्षीय चर्चा करतील. नंतर शिष्टमंडळ पातळीवरची टू प्लस टू चर्चा घेण्यात येईल. दोन्ही बाजूचे बारा अधिकारी या चर्चेत सहभागी होणार आहेत. दुपारी स्वराज, सीतारामन, पॉम्पिओ हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील.

सामरिक भागीदारी वाढवणे  हा चर्चेचा हेतू आहे. भारताला रशियाकडून हव्या असलेल्या एस ४०० प्रणालीच्या खरेदीबाबत अंतिम निर्णय अमेरिका देईल असे अपेक्षित आहे. रशियाशी लष्करी व्यवहारांवर अमेरिकेने निर्बंध घातले असले तरी आम्ही या करारावर पुढे जाणारच असे भारताने बजावले आहे. इराणकडून तेलाच्या आयातीची भारताची गरजही अमेरिकेला पटवून दिली जाईल. मे महिन्यात अमेरिकेने इराण अणुकरारातून माघार घेतली होती. इराण हा भारताचा तिसरा मोठा तेलपुरवठादार देश आहे.

इराक व सौदी अरेबिया हे पहिले दोन पुरवठादार आहेत. इराणच्या पेट्रोलियम पदार्थावर असलेल्या आयातीवरचे निर्बंध  ४ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले त्यामुळे भारतालाही फटका बसला होता. संदेशवहन, सुयोग्यता , सुरक्षा करार या मुद्दय़ांवर दोन्ही देश चर्चा करणार आहेत. अमेरिकी शिष्टमंडळाचे आगमन उद्या होणार असून परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ हे गुरुवारी सायंकाळीच भारतातून जाणार आहेत, तर संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस हे शुक्रवारी जातील. गुरुवारी सायंकाळी संरक्षण मंत्री सीतारामन यांनी भोजनाचे आयोजन केले आहे.