इराणने एमटी रिया बोटीवरील १२ पैकी नऊ भारतीयांची सुटका केली आहे. जुलैच्या सुरुवातील इराणने एमटी रिया बोट ताब्यात घेतली. अजूनही २१ भारतीय इराणच्या ताब्यात आहेत. यामध्ये एमटी रियावरील तीन आणि ब्रिटीश तेल टँकर स्टेना इम्पेरोवरील १८ जणांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय सुमद्र नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मागच्या आठवडयात इराणने होरमुझच्या सामुद्रधुनीतून स्टेना इम्पेरो हा ब्रिटीश तेल टँकर ताब्यात घेतला.

अमेरिकेने इराणवर पुन्हा निर्बंध लादल्यानंतर दोन्ही देशांमध्ये आखातात तणाव आहे. त्या पार्श्वभूमीवर इराणकडून ही जहाजे ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. दरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी ग्रेस १ जहाजावरील २४ भारतीयांची भेट घेतली.

सुटका करण्यासाठी सरकारकडून आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांना दिले आहे. ग्रेस १ हा इराणचा तेल टँकर ब्रिटनने ताब्यात घेतला आहे. लंडनमधील भारतीय दूतावासाच्या टीमने बुधवारी भारतीय क्रू मेंबर्सची भेट घेतली. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिली.