इराणने अमेरिकेला राजनैतिक चिठ्ठी पाठवून सौदी अरेबियाच्या तेल प्रकल्पावरील ड्रोन हल्ल्यामागे आपला हात नसल्याचे स्पष्ट केले आहे तसेच कुठलीही कारवाई केल्यास प्रत्युत्तर देण्याचा इशारा देखील दिला आहे. इराणमधील अमेरिकी हितसंबंधांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या स्विस दूतावासामार्फत सोमावरी ही चिठ्ठी पाठवण्यात आली. या हल्ल्यामध्ये इराणची काही भूमिका नाही यावर जोर देण्यात आला आहे असे आयआरएनए वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माइक पॉम्पिओ यांनी तेल प्रकल्पावरील हल्ल्यासाठी इराणला जबाबदार ठरवले आहे. त्यांच्या विधानाचा राजनैतिक नोटमध्ये निषेध करण्यात आला आहे. इराणवर कोणतीही कारवाई झाली तर लगेच प्रत्युत्तर दिले जाईल आणि ही फक्त धमकी समजू नका असेही राजनैतिक नोटमध्ये म्हटले आहे.

सोमवारी दुपारी हा संदेश पाठवण्यात आला. अमेरिकेप्रमाणे सौदी अरेबियाही इराणचा प्रतिस्पर्धी आहे. इराण या हल्ल्यामागे असू शकतो असे ट्रम्प यांनी म्हटले होते. शनिवारी अरामकोच्या दोन तेल तळांवर ड्रोन हल्ले करण्यात आले. अमेरिका आणि इराणमध्ये १९८० पासून राजनैतिक संबंध नाहीत. इराणमधील अमेरिकेच्या हितसंबंधांचे स्विस दूतावास प्रतिनिधीत्व करतो.

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करुन इराणला इशारा दिला. त्यानंतर इराणने अमेरिकेचे तळ, युद्धनौका आमच्या मिसाइलच्या रेंजमध्ये असल्याची उलटी धमकी दिली. काही महिन्यांपूर्वी इराणने अमेरिकेचे मानवरहित ड्रोन पाडल्यानंतरही असाच तणाव निर्माण झाला होता.

सौदी अरेबियाच्या तेल प्रकल्पावर हल्ला झाला आहे. यामागचा गुन्हेगार आम्हाला माहित आहे असे जर आम्ही म्हणत असू तर त्यामागे कारण आहे. आम्ही तयार आहोत. हल्ल्यामागे कोण आहे ते आम्हाला किंगडमकडून ऐकायचे आहे असे टि्वट ट्रम्प यांनी रविवारी केले. इराणचा पाठिंबा असलेल्या येमेनमधील हौथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तेल पुरवठयावर कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी अमेरिका मित्र देशांच्या मदतीने आवश्यक पावले उचलेल. या आक्रमकतेसाठी इराणला जबाबदार ठरवले जाईल असे अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले होते.