इराणमध्ये  फेसबुक पान चालवणाऱ्या आठजणांना न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. ते २१ वयोगटातील आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात फेसबुक पान चालवून कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर असून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचारमोहीम राबवली, अधिकाऱ्यांचा अपमान केला, असे आरोप त्यांच्यावर होते. हे आठजण नेमके कोण आहेत हे मात्र सांगण्यात आलेले नाही.
न्यायालयाने या आठ कार्यकर्त्यांना राजधानीसह विविध शहरातून अटक केली होती. एप्रिलपासून त्यांना अनेकदा न्यायालयापुढे हजेरी लावावी लागली तसेच फेसबुकवर इराणमध्ये बंदी घालण्यात आली असून ट्विटर व यू टय़ूबवर तसेच त्यांच्या मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. परराष्ट्र मंत्री महंमद जावद झरीफ हे मात्र ट्विटरवर आहेत व अनेक इराणी लोक गुप्त पद्धतीने या संकेतस्थळांचा वापर करीत आहेत.
 मे महिन्यात इराणी न्यायाधीशांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांना न्यायालयापुढे उपस्थित राहण्यास सांगितले असून इन्स्टाग्राम व व्हॉटसअ‍ॅप या अ‍ॅप्लीकेशनमुळे व्यक्तिगततेचा भंग करणाऱ्या व्यक्तींच्या तक्रारींना त्यांनीच उत्तर द्यावे अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली होती. इराणमधील विरोधी पक्ष निषेध मेळाव्यांसाठी या संकेतस्थळांचा वापर करीत होते.