02 June 2020

News Flash

इराणचा अमेरिकेला सज्जड इशारा!

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

आयातुल्ला खामेनी

बगदाद : अमेरिकेच्या कारवाईत इराणचे मेजर जनरल कासिम सुलेमानी हे ठार झाल्यानंतर इराणनेही आपण शांत बसणार नसल्याचे संकेत दिले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सुलेमानी ठार झाल्यानंतर खामेनी यांनी काही ट्वीट्स केली आहेत.

‘‘सुलेमानी यांनी अनेक वर्षे अविश्रांत मेहनत घेतली, शहीद होणे हाही एक पुरस्कार आहे’’, असे खामेनी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. खामेनी यांनी देशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

सुलेमानी यांचे कार्य आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावरूनच इराणची यापुढे वाटचाल सुरू राहील, ज्या गुन्हेगारांनी हे कृत्य केले आहे, त्यांना सोडणार नाही, असा निर्धारही खामेनी यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केला आहे. ‘‘आमच्या सर्व शत्रुंनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, की जिहाद यापुढेही सुरू राहील आणि त्याला दुप्पट बळ मिळेल, या पवित्र लढाईमध्ये निश्चितच विजय होईल’’, असे खामेनी यांनी सरकारी वाहिनीवरील संदेशात म्हटले आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद झरिफ यांनीही अमेरिकेवर टीका केली आहे. अमेरिकेने धोकादायक पाऊल उचलले असून त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी म्हटले आहे.

इस्माइल कानी कुड्सचे नवे प्रमुख नियुक्त

तेहरान : अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे कमांडर मेजर जनरल सुलेमानी ठार झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी  ब्रिगे. जनरल इस्माइल कानी यांची इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्सच्या कुड्स दलाचे कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे.

ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रध्वज ट्वीट

सुलेमानी ठार झाल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्वज ट्वीट केला आहे. या ट्वीटद्वारे ट्रम्प यांनी जगाला संदेश दिला असल्याचे बोलले जात आहे. कोणताही मजकूर नसलेल्या ट्वीटमध्ये अमेरिकेचा राष्ट्रध्वज दिसत आहे. गेल्या वर्षांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध लादले आहेत.

तणाव वाढण्याची रशियाला भीती

मॉस्को : अमेरिकेने सुलेमानी यांना ठार केल्याने मध्य पूर्वेतील तणाव वाढणार असल्याचा इशारा शुक्रवारी रशियाने दिला आहे. सुलेमानी यांना ठार करण्याचे साहसी पाऊल उचलण्यात आल्याने या प्रदेशातील तणाव कमालीचा वाढणार आहे, असे आरआयए नोव्होस्ती आणि तास या वृत्तसंस्थांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे.

फ्रान्सचा इशारा

पॅरिस  : अमेरिकेने सुलेमानी यांना ठार केल्याने जग अधिक धोकादायक झाले असल्याची प्रतिक्रिया फ्रान्सने व्यक्त केली आहे. मध्य पूर्वेतील संघर्ष निवळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही फ्रान्सने केले आहे.

चीनचे संयम राखण्याचे आवाहन

बीजिंग : अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे मेजर जनरल सुलेमानी ठार झाल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनने सर्वाना विशेषत: अमेरिकेला संयम पाळण्याची विनंती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 3:25 am

Web Title: iran warns of revenge for us killing of soleimani zws 70
Next Stories
1 अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी ठार ; आखातात तणाव
2 इराणच्या धमकीनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सूचक टि्वट
3 तात्काळ इराक सोडा, अमेरिकेची आपल्या नागरिकांना विनंती
Just Now!
X