News Flash

…तर पाकमध्ये घुसून हल्ला करणार; इराणचा इशारा

इराण सैन्यातील दहा सैनिकांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता

इराणचे लष्कर प्रमुख मोहम्मद बाकेरी (संग्रहित छायाचित्र)

भारत- पाकिस्तान सीमारेषेवर तणाव निर्माण झाला असतानाच दुसरीकडून इराणनेही पाकिस्तानला इशारा दिला आहे. सीमा रेषा ओलांडून इराणमध्ये येणाऱ्या सुन्नी दहशतवाद्यांना रोखले नाही तर पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करु असा इशारा इराणच्या सैन्य प्रमुखांनी दिला आहे.

इराण आणि पाकिस्तान सीमा रेषेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात इराण सैन्यातील दहा सैनिकांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. जैश अल अदल या सुन्नी दहशतवाद्यांच्या संघटनेने हा हल्ला केल्याचा दावा इराणने केला होता. पाकिस्तानच्या हद्दीतून लांब पल्ल्याच्या गनचा वापर करत दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे इराणचे म्हणणे आहे. दहशतवादी कारवाया आणि अमली पदार्थांची तस्करी यामुळे इराण- पाकिस्तान सीमारेषेवर नेहमीच तणाव असतो. पण आता इराणनेही पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम्ही सीमारेषेवर अशी परिस्थिती खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया इराणचे लष्कर प्रमुख मोहम्मद बाघेरी यांनी दिली. पाकिस्तानने सीमारेषेवर लक्ष देऊन दहशतवाद्यांना अटक करावी आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करावे असे त्यांनी सांगितले. पण पाकिस्तानने पाऊल उचलले नाही तर आम्हीच पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करु असा इशाराच इराणच्या लष्कर प्रमुखांनी दिला आहे.
इराणमधील परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद झरीफ यांनी गेल्या आठवड्यात पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्यात झरीफ यांनी सीमारेषेवरील सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. तर पाकिस्तानने इराणच्या सैन्याने सीमा रेषा ओलांडून पाकमध्ये येऊ नये असे सांगत इराणवर पलटवार केला होता.

२०१४ मध्ये पाकिस्तानमधील जैश अल अदल या दहशतवादी संघटनेने इराणच्या पाच जवानांचे अपहरण केले होते. पाकिस्तानने जवानांची सुटका करण्यासाठी कारवाई केली नाही तर आम्हीच पाकमध्ये घुसून कारवाई करु अशी भूमिका इराणने मांडली होती. तर इराण सैन्याने सीमा रेषा ओलांडून पाकमध्ये प्रवेश करु नये असा इशारा पाकने दिला होता. अपहरण झालेल्या पाच पैकी चार जवानांना दहशतवाद्यांनी काही महिन्यांनी सोडून दिले होते. तर एकाही हत्या करण्यात आली होती. जैश अल अदल ही सुन्नी दहशतवाद्यांची संघटना आहे. इराणमधील अल्पसंख्याक सुन्नी मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप करत ही दहशतवादी संघटना इराणमधील सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 7:59 pm

Web Title: iran warns pakistan will hit terrorist bases inside pakistan sunni militants jaish al adl major general mohammad bagheri
Next Stories
1 धक्कादायक! जम्मू काश्मीरात दगडफेकीसाठी विद्यार्थ्यांना दिले जातात पैसे
2 भारतातील पाकच्या उच्चायुक्तपदी सोहील महमूद
3 एसबीआयच्या ग्राहकांना दिलासा; रांगेपासून होणार सुटका
Just Now!
X