भारताकडून विकास; पाकिस्तानच्या ग्वादर बंदराला शह

भारताच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या इराणमधील चाबहार बंदराच्या पहिल्या विस्तारित टप्प्याचे रविवारी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या बंदरामुळे भारताला इराणमधून अफगाणिस्तानशी संपर्क साधता येणार आहे. तसेच येथून पूर्वेला केवळ ८० किलोमीटर अंतरावर पाकिस्तानच्या किनाऱ्यावर चीन विकसित करत असलेल्या ग्वादर या बंदराला शह देता येणे शक्य होणार आहे.

उद्घाटनाच्या कार्यक्रमाला इराण, भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान यांच्यासह अन्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या वतीने सागरी वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री पोन राधाकृष्णन हे उपस्थित होते. तसेच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी तेहरानमध्ये इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांची धावती भेट घेऊन प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. उद्घाटनाच्या भाषणात रुहानी यांनी मात्र पाकिस्तान आणि चीनच्या ग्वादर येथील प्रकल्पावर टीका न करता त्याचेही स्वागतच केले. चाबहार आणि ग्वादर या दोन्ही बंदरांमध्ये सकारात्मक स्पर्धा व्हावी आणि त्यातून या क्षेत्रातील देशांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त व्हावा, अशी अपेक्षा रुहानी यांनी यावेळी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०१६ मध्ये इराणला दिलेल्या भेटीत भारत, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये संपर्क विकसित करण्याचा त्रिपक्षीय करार करण्यात आला. त्यानुसार भारत इराणला चाबहार बंदर विकसित करण्यास मदत करणार आहे. तसेच इराणमधून पुढे अफगाणिस्तानमधील झरंज आणि देलाराममार्गे थेट काबुलपर्यंत रस्ता व रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. याशिवाय चाबहारच्यापुढे मध्य आशियातील देश आणि थेट रशियाशी संपर्क साधण्याची योजना आहे.

भारताने गतवर्षी या बंदराच्या विकासासाठी ५०० दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली होती. त्यातून चाबहार बंदराचा विस्तार करण्यात येत आहे. या बंदराची माल हाताळण्याची क्षमता पूर्वी वर्षांला २.५ दशलक्ष टन इतकी होती. आता ती वर्षांला ८.५ दशलक्ष टन इतकी वाढवण्यात आली आहे.