अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी इराणचे रॉकेट प्रक्षेपण फसल्याचा एक फोटो टि्वट केला व अमेरिकेचा याच्याशी काही संबंध नाही असा संदेशही लिहिला होता. उत्तर इराणमधील सेम्नन अवकाश तळावर गुरुवारी ही दुर्घटना घडली. लाँच पॅडवर रॉकेटचा स्फोट झाला. इराणने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

इराणला डिवचणाऱ्या ट्रम्प यांच्या टि्वटनंतर एक नवा वाद निर्माण झाला आहे. ट्रम्प हा फोटो टाकून अमेरिकेची टेहळणीची क्षमता आणि सिक्रेटस उघड करतायत का? असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे. इराणचा साफीर उपग्रह अवकाशात सोडण्याचा प्रयत्न होता. पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. ट्रम्प यांनी हाय रेसोल्युशन असलेला फोटो टि्वट केला आहे.

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना आपल्या फोटो टाकण्याच्या कृतीचे ट्रम्प यांनी समर्थन केले व अमेरिकेचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचा पुनरुच्चार केला. आमच्याकडे फोटो होता. मी तो प्रसिद्ध केला. मला तो अधिकार आहे असे ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्यावर्षी इराण बरोबर २०१५ साली झालेल्या अण्विक करारातून एकतर्फी माघार घेतली. या निर्णयानंतर इराणवर पुन्हा आर्थिक निर्बंध घालण्यात आले. अमेरिकेने भारतासह अनेक देशांना इराणकडून तेल खरेदी करण्यावर बंद करायला लावली. मागच्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे. आता ट्रम्प यांच्या फोटो टाकण्याच्या कृतीनंतर हा तणाव आणखी वाढू शकतो.