दिल्लीत झालेल्या हिंसाचारावरुन इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी भारतावर जोरदार टीका केली आहे. ‘कट्टर हिंदूंचा सामना करा व मुस्लिमांचे हत्याकांड थांबवा, अन्यथा इस्लामिक जगापासून दूर जाऊन एकटे पडाल’ असा इशारा खामेनी यांनी भारताला दिला आहे.

“भारतात मुस्लिमांबरोबर जे झाले, त्यामुळे जगभरातील मुस्लिम दु:खी आहेत. भारत सरकारने कट्टर हिंदू आणि त्यांच्या पक्षांचा मुकाबला करुन मुस्लिमांचे हत्याकांड थांबवावे. अन्यथा इस्लामिक जगापासून भारत दूर जाऊन एकटा पडेल” असे खामेनी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

दिल्ली हिंसाचारावरुन इराणचे परराष्ट्रमंत्री जावद झारीफ यांनी केलेल्या वक्तव्यावरुन भारताने आपली असहमती, नाराजी प्रगट केली होती. त्यानंतर दोनच दिवसात खामेनी यांनी अशा प्रकारचे टि्वट केले आहे. भारतात मुस्लिमांविरोधात संघटित पद्धतीने करण्यात आलेल्या हिंसाचाराचा निषेध आहे असे टि्वट झारीफ यांनी सोमवारी केले होते.

झारीफ यांच्या टि्वटनंतर दुसऱ्याच दिवशी भारताने इराणच्या राजदूतांना पाचारण करुन टि्वट संदर्भातील आपली नाराजी कळवली होती. मागच्या अनेक वर्षांपासून भारत आणि इराणमध्ये चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण दिल्ली हिंसाचारावर इराणने घेतलेली भूमिका आश्चर्यकारक आहे. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे भारताने इराणकडून तेल आयात बंद केली आहे. पण त्याचवेळी इराणमधील चाबहार बंदराच्या विकास प्रकल्पात भारताची मोठी गुंतवणूक आहे. चीन-पाकिस्तानचा विचार करता, रणनितीक दृष्टीने भारतासाठी हे अत्यंत महत्वाचे बंदर आहे.