गेले चार दिवस इराकमधील अतिरेक्यांनी बगदाद शहराकडे सुरू केलेले कूच रोखण्यात इराकी सैन्याला यश आले आहे. या प्रतिहल्ल्यांत इराकी सैन्यास शिया पंथीय मुस्लिम आणि कुर्द वंशीय लढवय्या नागरिकांनी सहकार्य केले आहे. अतिरेक्यांच्या ताब्यातील काही शहरे परत मिळवण्यात इराकी फौजांना यश आले आहे.  तर, अमेरिकेनेही आपली विमानवाहू युद्धनौका इराकच्या दिशेने धाडली आहे.
रविवारी इराकमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली. यावेळी बचावार्थ सरसावलेल्या नागरी फौजांवर अतिरेक्यांनी रॉकेटस्चा मारा केला. इराकी सैन्याकडून चोरलेल्या शस्त्रांनी अतिरेकी नागरिकांना वेठीस धरू पहात होते. यात कित्येक नागरिक जखमी झाले. मात्र तरीही त्यांनी चिकाटी सोडली नाही आणि राष्ट्रीय लष्करासह तीव्र प्रतिकार केला.
धर्मगुरुंचे आवाहन
इराकमधील शिया पंथीय मुस्लिमांचे धर्मगुरु अयातोल्ला अली अल् सिस्तानी यांनी शिया बंडखोरांना शस्त्रे देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच शियापंथीयांनीही अतिरेक्यांविरोधात उग्र लढाई छेडावी असे म्हटले आहे.
भीती आणि शौर्य
अतिरेक्यांच्या अकल्पित हल्ल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस शिया पंथीय मुसलमान घाबरले होते. या हल्ल्यावर मात कशी करायची याचे उत्तर त्यांना सापडत नव्हते. मात्र शनिवारी प्रतिहल्ल्याचे सूत्र स्वीकारण्याचा निर्णय घेतला गेला. इराकी फौजांना शिया स्वयंसेवक आणि शिया प्रतिहल्लेखोरांनी सहकार्य देण्याचे ठरविले आणि बघता बघता सगळी दिशाच बदलली, असे एका प्रत्यक्षदर्शी राजकीय निरीक्षकाने म्हटले आहे.
भारतीयांना आवाहन
भारतीयांनी सद्यस्थितती इराकमध्ये जाणे टाळावे, अशी मार्गदर्शनपर सूचना भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली आहे. तसेच सद्यस्थिती लक्षात घेता, तेथे असलेल्या भारतीय नागरिकांनी शक्य तितक्या तातडीने परत यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या युद्धनौकांची पर्शियन आखाताकडे कूच
इराकमधील हिंसाचाराने परिस्थिती बिघडली असताना आता अमेरिकेने पर्शियन आखातात विमानवाहू युद्धनौका पाठवण्याचे आदेश दिले आहेत. इराकमधील इस्लामी अतिरेक्यांविरोधात लढण्यासाठी एकजूट करण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. संरक्षणमंत्री चक हॅगेल यांनी सांगितले, की यूएसएस जॉर्ज एच डब्ल्यू बुश ही युद्धनौका उत्तर अरेबियन समुद्रात पाठवण्यात येत आहे, कारण इराकविरोधी लष्करी कारवाई करण्याचा पर्याय ओबामा प्रशासनापुढे खुला आहे. या युद्धनौकेबरोबर यूएसएस फिलीपाइन सी हे क्षेपणास्त्र सज्ज क्रूझर व यूएसएस ट्रक्सटन ही क्षेपणास्त्र विनाशिका पाठवण्यात आली असून त्यात टॉमहॉक क्षेपणास्त्रे आहेत. दिवसभरात या युद्धनौका व विनाशिका पर्शियाच्या आखातात पोहोचतील. बुश युद्धनौकेवरील विमाने इराकमध्ये सहज बॉम्बवर्षांव करू शकतात. इस्लामी अतिरेक्यांनी इराकमध्ये उच्छाद मांडला असून, बगदादच्या उत्तरेकडील बराच प्रदेश ताब्यात घेतला आहे. सुमारे ७० लाख लोकांना या अतिरेक्यांची आगेकूच होत असल्याने महागाईस तोंड द्यावे लागत आहे, असे केरी यांनी सांगितले.