इराकमध्ये थमान घातलेल्या सुन्नी दहशतवाद्यांच्या कारवायांचे निराकरण करण्यासाठी इराक सरकारने पाऊल उचलले असून, दहशतवाद्यांच्या गटांवर हवाई हल्ले करण्यात येत आहे. बिजी या देशातील सर्वात मोठय़ा तेल शुद्धीकरण केंद्राचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला होता. मात्र त्यांच्यावर हवाई हल्ले करून हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या हल्ल्यात ३० दहशतवाद्यांना ठार मारण्यात इराकी सैन्यदलाला यश आले आहे.
इराक सैन्यदलाच्या विमानांनी दहशतवाद्यांच्या वाहनांवर हल्ले केले आहेत. सीरियाच्या सीमा भागात कैम शहराजवळ असलेल्या काही घरांवरही हवाई हल्ले करण्यात आले आहेत. या घरांमध्ये दहशतवाद्यांची निवासस्थाने असल्याची माहिती सैन्यदलाला मिळाली होती.