इराकच्या उत्तरेकडील मोसुल हे महत्त्वाचे शहर ताब्यात घेतल्यानंतर अतिरेक्यांनी आता आपला मोर्चा बगदादकडे वळवला आहे. मंगळवारी ते बगदादपासून अवघ्या ६० किमीवर येऊन ठेपले असून त्यांची आगेकूच रोखणे इराकी सैन्याच्या आवाक्याबाहेरचे असल्याचे बोलले जात आहे. तर संयुक्त राष्ट्रांनीसुद्धा हा संघर्ष ‘जीवघेणा’ असल्याचे घोषित करून त्याचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.
इराकच्या उत्तरेकडील सुमारे २० लाख वस्तीचे आणि व्यूहात्मकदृष्टय़ा महत्त्वाचे मोसुल हे शहर ताब्यात घेतल्यानंतर ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड लेव्हण्ट’ अर्थात ‘इसिस’च्या फौजांनी जोमाने आपला मोर्चा बगदादकडे वळवला. गेल्या सात दिवसांत या फौजांची आगेकूच रोखणे इराकी सैन्याला जमलेले नाही. तशात इसिसचे सैन्य बगदादपासून अवघ्या ३७ मैलांवर (६० किमी) येऊन ठेपल्याने बगदादमधील स्थिती गंभीर झाली आहे. अतिरेक्यांनी काल रात्री बाकुबा हे बगदादच्या वेशीवरील शहर काही काळ ताब्यात घेतले होते. परंतु इराकी सैन्याने हा हल्ला परतवून लावला. मात्र त्यामुळे बगदादवरील संकटाचे ढग अधिक गडद झाले आहेत. आपले लक्ष्य बगदादच्याही दक्षिणेकडील करबाला हे शहर असल्याचेही इसिसने घोषित केले आहे.

भारतीयांची स्थिती
इराकमधील परिस्थिती पाहता तेथील भारतीयांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. मोसुल व तिरकिट येथे काही नागरिक अडकून पडले असून भारताचा सतत इराकशी संपर्क आहे. तेथील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्तयाने सांगितले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या बगदादच्या दूतावासाशी संपर्क साधून माहिती घेत आहेत. पूर्वेकडील परराष्ट्र सचिव अनिल वधवा यांनी इराकी राजदूत अहमद तहसिन अहमद बेरवारी यांची भेट घेऊन परिस्थितीची कल्पना दिली. आजच आपत्कालीन स्थितीची बैठक बोलवा असे सुषमा स्वराज यांनी वधवा यांना सांगितले आहे. बगदादमधील दूतावासाने २४ तास हेल्पलाइन सुरू केली.

भारतीय रुग्णसेविकांच्या संपर्कात
नवी दिल्ली : इराकमध्ये उद्भवलेल्या अराजकसदृश परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीय रुग्णसेविकांच्या संपर्कात असल्याचे भारताने म्हटले आहे. तसेच तिकरित येथून त्यांना सुखरूप बाहेर पडता यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र व्यवहार खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. भारताच्या विनंतीवरून आंतरराष्ट्रीय रेड क्रेसेंट या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तिकरितमधील ४६ रुग्णसेविकांशी संपर्क साधला असून, त्या सर्व सुखरूप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दूतावासात २७५ जवान
इराकमधील अतिरेकी संघटना बगदादच्या दिशेने कूच करत असल्यामुळे तसेच तेथील अमेरिकी नागरिकांना असलेला धोका लक्षात घेत अमेरिकेने आपल्या दूतावासाच्या संरक्षणार्थ २७५ जवान तेथे धाडले आहेत. आमच्या परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांचे संरक्षण करण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि त्यासाठी सर्व ती पावले उचलली जातील, असे परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीयांच्या सुरक्षिततेची सर्व हमी येथील सुरक्षा दलांनी दिली आहे.

अमेरिकेची इराणशी चर्चा
वॉशिंग्टन : इराणमधील अण्वस्त्र कार्यक्रमावर अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू आहे. मात्र इराकमधील अराजकसदृश परिस्थितीमुळे त्याविरोधात सर्व संभाव्य एकत्रित कारवायांविषयी अमेरिकेने इराणशी चर्चा केली. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री जॉन केरी यांनी सोमवारी याविषयी सूचक वक्तव्ये केली होती. इराकमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आणणे नितांत गरजेचे असून, त्यासाठी गरज पडल्यास इराणची मदत घेण्याचा पर्यायही अवलंबिला जाईल, असे केरी यांनी म्हटले होते. त्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेने ही चर्चा केली. मात्र या चर्चेत सामरिक कारवाया तसेच लष्करी सहकार्याबाबत तपशीलवार चर्चा झालेली नाही, असे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आयआयएल या अतिरेकी संघटनेचा जगभरास असलेला वाढता धोका लक्षात घेत त्याविरुद्ध काय धोरणे आखता येतील यावर सविस्तर चर्चा झाली.

* उत्तर इराकमधील शिया बहुल शहरे दहशतवाद्यांच्या ताब्यात
*  सुरक्षा दले व नागरी योद्धय़ांनी तल अफार या निनेवेह प्रांतातील शहर लढवले
* पोलीस, नागरिक व रहिवाशांचा लढा सुरू
* किमान ५० नागरिक व काही अतिरेकी ठार ५००-७०० अतिरेकी हल्ल्यात सामील  
* मोसुल ताब्यात
* दहशतवाद्यांनी मध्य इराकमधील बाकुबा शहराचा ताबा घेतला
* इराकच्या सुरक्षादलांची कामगिरी निराशाजनक