इराकमध्ये सुन्नी अतिरेक्यांनी महत्तावाची शहर ताब्यात घेण्याचे सत्र सुरूच ठेवले असून त्यांनी पश्चिम इराकमध्ये आघाडी घेतली आहे. त्या वेळी धुमश्चक्रीत २१ जण ठार झाले. अनेक शहरांतून सुरक्षा दलांनी माघार घेतली. दरम्यान सोमवारी तल आफर हे उत्तर इराकमधील महत्वाचे शहर व तेथील विमानतळ अतिरेक्यांनी ताब्यात घेतला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी असा इशारा दिला, की या हल्ल्यांचा विस्तार या भागातील इतर देशांमध्ये होऊ शकतो. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी जॉर्डनहून बगदादला आले असून ते पंतप्रधान नूर अल मलिकी यांची भेट घेऊन त्यांना चार शब्द सुनावणार आहेत. इराकी नेत्यांमध्ये एकजूट घडवण्याचा प्रयत्न ते करतील, असे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी सांगितले.
इराकी सैन्यदलांची पिछेहाट होत असून ते अतिरेक्यांचा सामना करण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे देशवासीयांना धोका वाटत आहे. जिहादी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (आयसिल) या संघटनेच्या वतीने या लढय़ाचे नेतृत्व केले जात असून त्यात रावा व अ‍ॅना ही शहरे शनिवारी ताब्यात घेण्यात आली. रावा व अ‍ॅना येथे दोन दिवसांतील िहसाचारात २१ जण ठार झाले असून, सरकारने आमच्या सैन्यदलांची माघार डावपेचात्मक असल्याचे सांगितले. आयसिल या संघटनेला मात्र इराक व सीरिया यांचा मिळून एक देश तयार करायचा आहे. अमेरिकेने म्हटले आहे, की अरब देशांनी इराकवर सरकार स्थापनेसाठी वेगाने प्रक्रिया करावी. आपण अधिक दक्ष असले पाहिजे असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.
अतिरेक्यांनी पश्चिम वाळवंटातील अनबार भाग ताब्यात घेतला असून, रामाडी ही अनबारची राजधानी त्यांच्या ताब्यात गेली आहे. कारबॉम्ब स्फोटात तेथे सहा लोक ठार झाले. अतिरेकी १५ वर्षांच्या मुलांना युद्धात वापरत असल्याचा आरोप मानवी हक्क निरीक्षण संस्थेने केला आहे. सरकारी दलांनी तिकरित येथे हवाई हल्ले केले. त्यात सात जण ठार झाले तर मोसुल या उत्तरेकडील शहरातही बॉम्बफेक करण्यात आली.