इराकमधील उत्तर बगदादच्या शिया भागात एका तपासणी नाक्याजवळ हल्लेखोराने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान १२ जण ठार झाले आहेत, असे इराकी सुरक्षा दले व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या स्फोटात २२ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी कुणीही घेतली नसून, आयसिसने यापूर्वी इराकी सुरक्षा दलांवर अनेकदा बॉम्बहल्ले केले आहेत व शिया बहुल लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. शिया लोकांना धर्मविरोधी समजून त्यांच्यावर हल्ले केले जातात. बगदादच्या मध्य कराडा जिल्हय़ात या महिन्याच्या सुरुवातीला आत्मघाती हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात २९२ जण ठार झाले होते व त्यानंतर बगदादच्या उत्तरेला बलाड येथे शिया धर्मस्थानावर केलेल्या हल्ल्यात ४० जण ठार झाले होते. बगदादच्या उत्तर व पश्चिमेला २०१४ मध्ये आयसिसने बराच भाग काबीज केला होता, पण नंतर इराकी सैन्यदलांनी तो पुन्हा ताब्यात घेतला. मोसुल हे शहर मात्र अजून आयसिसच्या ताब्यात असून, ते ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिहादींनी भूप्रदेश गमावला असला तरी त्यांनी नागरिकांवर हल्ले सुरू ठेवले आहेत, त्यामुळे जिहादींवर आणखी बॉम्बहल्ले करण्यात येतील असे सांगितले जाते.