इराकमध्ये यापुढे परदेशी फौजा राहू नयेत आणि त्यांनी इराकची भूमी, हवाई क्षेत्र आणि सागरी क्षेत्र यांचा कुठल्याही कारणासाठी वापर करू नये, असा ठराव इराकच्या संसदेने रविवारी पारित केला.

इराकमधील लष्करी मोहिमा थांबवण्यात आल्यामुळे आणि विजय मिळाल्यामुळे, आयसिसशी लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय आघाडीने आपल्याला साहाय्य करण्याबाबत केलेली विनंती सरकार आता मागे घेत असल्याचे या ठरावात म्हटले आहे. इराकी सरकारने इराकच्या भूमीवरील कुठल्याही परदेशी फौजांचे अस्तित्व संपवण्यासाठी काम करावे आणि त्यांना कुठल्याही कारणासाठी आपली भूमी, हवाई क्षेत्र आणि सागरी क्षेत्र यांचा वापर करू देण्यास प्रतिबंध करावा, असे यात नमूद केले आहे.

इराकी पंतप्रधान अदेल अब्दुल माहदी यांनी संसदेला परदेशी फौजा हटवण्याचे आवाहन केले होते.

कासिम सुलेमानी यांचे पार्थिव इराणमध्ये

तेहरान : बगदादमध्ये अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेले इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांचे पार्थिव रविवारी पहाटेपूर्वीच इराकमधून इराणच्या अहवाझ शहरात आणण्यात आले. तेथे असंख्य नागरिकांनी सुलेमानी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.