एका दाम्पत्याला स्वतःसमोर शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून त्याचे व्हिडिओ चित्रिकरण करून ते इंटरनेटवर अपलोड केल्याबद्दल इंडिया रिझर्व्ह बटालियनमधील चार जवानांना निलंबित करण्यात आले. या जवानांमध्ये दोन हवालदारांचा समावेश आहे.
मणिपूरमधील चुराचंदपूर जिल्ह्यातून या चौघांना ताब्यात घेण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याच जिल्ह्यातील घुगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यात एक दाम्पत्य शारीरिक संबंध ठेवताना या जवानांनी बघितले. हा संपूर्ण परिसर लष्कराच्या ताब्यात असल्याने तिथे सामान्य नागरिकांना येण्यास बंदी आहे. हे जवान तिथे गस्त घालत असताना त्यांना तिथे दाम्पत्य आढळले. त्यानंतर त्यांनी संबंधित दाम्पत्याला बळजबरीने पुन्हा शरीरसंबंध ठेवण्यास सांगून त्याचे आपल्याकडील मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. जवानांनी मोबाईलमधील चित्रण इंटरनेटवरही टाकले. या जवानांनी संबंधित महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप गावकऱयांनी केला. या घटनेनंतर आयआरबीच्या जवानांविरुद्ध परिसरात संतापाचे वातावरण पसरले आणि त्यांनी याविरुद्ध आंदोलन करण्यास सुरुवात केली.