करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशा लॉकडाउनची घोषणा केलेली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आलेले आहेत. मात्र देशतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. हे पाहता  आयआरसीटीसीने आपल्या खासगी रेल्वेचे बुकिंग 30 एप्रिल पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयआरसीटीसीकडून तीन खासगी रेल्वे चालवल्या जातात. ज्यामध्ये दोन तेजस ट्रेन आणि एक काशी महाकाल एक्स्प्रेसचा समावेश आहे. या तिन्ही रेल्वेंचे बुकिंग केलेल्या सर्व प्रवाशांना त्यांचे संपूर्ण पैसे रिफंडद्वारे मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. लॉकडाउनमुळे या तिन्ही रेल्वेंचे 25 मार्च ते 15 एप्रिलपर्यंतचे सर्व बुकिंग बंद करण्यात आले होते. मात्र आयआरसीटीसीकडून आता 30 एप्रिल पर्यंत सर्व बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या अगोदर संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा ३१ मार्चऐवजी १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. प्रवासी वाहतूक बंद असली तरी देशातील मालगाड्या सुरू राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं होतं. तसेच, ज्या प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट काढले असतील त्यांनी चुकूनही तिकीट कॅन्सल करु नये असे आवाहनही आयआरसीटीसीकडून प्रवाशांना करण्यात आलं होतं.

“१४ एप्रिलपर्यंत रद्द झालेल्या रेल्वेसांठी ज्या प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट काढले असेल त्यांनी ते तिकीट रद्द करु नये, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. रद्द झालेल्या रेल्वेच्या तिकीटाचे पैसे रेल्वेकडून आपोआप प्रवाशांच्या खात्यात जमा होत असतात , त्यामुळे त्यांनी तिकीट रद्द करायची गरज नाही. उलट तिकीट रद्द केल्यास त्यांना आर्थिक नुकसान होईल आणि दंडाची आकारणी होऊन कमी पैसे परत मिळण्याची शक्यता आहे”, असे आयआरसीटीसीने सांगण्यात आलं होतं.