मुंबई : आयआरसीटीसीच्या समभागांचे भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी दमदार स्वागत केले. आयआरसीटीसीच्या बाजारातील व्यवहाराला सुरुवात ६४४ रुपयांनी झाल्याने गुंतवणूकदारांना १०२% अधिमुल्य मिळाले. बाजार बंद होताना समभाग ७२८ वर बंद झाला.

कंपनीने गुंतवणूकदारांना १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या समभागाची ३१० रुपये अधिमूल्य आकारून विक्री केली होती. केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपनीने प्रारंभिक सार्वजनिक विक्रीद्वारे भांडवली बाजारातून ६४५ कोटी रुपये उभारले. उपलब्ध सामाभागापेक्षा ११२ पट अधिक मागणी गुंतवणूकदारांनी नोंदली.

‘लोकसत्ता’ने समभाग विश्लेषकांकडे समभागांच्या दमदार नोंदणीबाबत विचारणा केली असता, मतमतांतरे आढळून आली.

काही जणांना वाटते की, आयआरसीटीसी ही एक चांगली दीर्घ-मुदतीची गुंतवणूक असेल. कारण या कंपनीची व्यवसायातील मक्तेदारी असल्याने कंपनीला सेवेचे मूल्य ठरविण्याची मुभा आहे.

तथापि, इतर विश्लेषकांच्या मते, समभागाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे समभागाची नोंदणी मोठय़ा अधिमुल्याने होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे मोठे अधिमूल्य मिळत असल्याने प्राथमिक सार्वजनिक विक्रीत मिळालेल्या किरकोळ गुंतवणूकदारांना नफा कमवून बाहेर पडायला हवे.

मुंबई शेअर बाजारात कंपनीचे बाजार भांडवल ११,६५७.६० रुपये झाले.