आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण
मणिपूरच्या मानवी हक्क कार्यकर्त्यां शर्मिला इरोम यांना दिल्ली न्यायालयाने २००६ मधील जंतरमंतर येथे उपोषणाच्या वेळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात दोषमुक्त ठरवले आहे. महानगर दंडाधिकारी हरविंदर सिंग यांनी शर्मिला इरोम यांना ४ मार्च २०१३ रोजी त्यांच्यावर भरण्यात आलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाच्या खटल्यात निर्दोष ठरवले. मणिपूरच्या मानवी हक्क कार्यकर्त्यां असलेल्या इरोम या गेली सोळा वर्षे उपोषण करीत आहेत. मणिपूरमधील एएफएसपीए कायदा रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे. ४ ऑक्टोबर २००६ रोजी इरोम यांनी या मागणीकरिता दिल्लीत जंतरमंतर येथे प्राणांतिक उपोषण केले होते.
इरोम यांनी काल न्यायालयात सांगितले, की आम्र्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अ‍ॅक्ट (एएफएसपीए) हा कायदा रद्द केला तर आपण उपोषण रद्द करू व त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याची आपली इच्छा आहे. शर्मिला इरोम यांना सध्या नाकातून नळीवाटे अन्न देण्यात येते. शर्मिला यांच्यावर आत्महत्येच्या प्रयत्नाचा आरोप ठेवण्यात आला होता.
शर्मिला या आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी न्यायालयाला सांगितले, की माझा निषेधाचा मार्ग अहिंसेचा आहे.