आयर्न लेडी म्हणून परिचित असलेल्या इरोम चानू शर्मिला या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या जुलैमध्ये मित्र डेजमन कॉटिनहोसोबत इरोम शर्मिलांचा विवाह होणार आहे. तामिळनाडूमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. मणिपूरमधील लष्करी दले विशेष अधिकार कायदा (अफ्स्पा) रद्द करण्याच्या मागणीसाठी इरोम शर्मिला तब्बल १६ वर्षे उपोषण करत होत्या. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी हे उपोषण सोडले होते. त्यानंतर इरोम शर्मिला यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. याचवेळी त्यांनी लग्न करण्याची इच्छासुद्धा बोलून दाखवली होती. त्यांची ही इच्छा आता प्रत्यक्षात येणार आहे.

इरोम शर्मिला यांचे भावी पती कॉटिनहो हे मुळचे गोव्याचे असून अनिवासी भारतीय आहेत. इरोम शर्मिला यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्नाच्या आरोपावरून इम्फाळ न्यायालयात खटला सुरू असताना कॉटिनहो प्रत्येक सुनावणीला हजर असायचे. इरोम आणि कॉटिनहो यांना सुरूवातीला विरोधही सहन करावा लागला होता. कॉटिनहो यांनी एकदा न्यायालयात इरोम यांचा हात धरल्याने काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली होती. अशाप्रकारचे वर्तन मणिपूरच्या संस्कृतीला धरून नसल्याचा आक्षेप या महिलांनी घेतला होता. या घटनेनंतर कॉटिनहो यांनी इरोम यांच्या सुनावणीच्यावेळी न्यायालयात जायचे थांबवले होते. इरोम शर्मिला यांचे उपोषण सुरू असताना अनेकांनी तुरूंगात त्यांना मोबाईल आणि लॅपटॉप कसा काय मिळाला, याबद्दल सवाल उपस्थित केले होते. याशिवाय, कॉटिनहो यांच्या उपस्थितीवरही प्रसारमाध्यमांनी शंका उपस्थित केल्या होत्या. त्यानंतर कॉटिनहो यांनी प्रसारमाध्यमांविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. या प्रकाराबद्दल इरोम शर्मिला यांनी सगळ्यांची माफीही मागितली होती.

मात्र, आता इरोम शर्मिला आणि कॉटिनहो यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात इरोम शर्मिला मणिपूरमधून अफ्स्पा कायदा हटवण्यासाठीची आपली लढाई सुरूच ठेवणार आहेत. यासाठी त्या परदेशी संस्थाचीही मदत घेतील. कार्यात डेजमन यांचीही शर्मिलांना साथ मिळणार आहे.

मणिपूर विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असणाऱ्या इरोम शर्मिला यांना अवघी ९० मतेच मिळाली होती. या विदारक अपयशाने आणि मणिपूरमधील लोकांच्या अविश्वासाने खचून, इरोम शर्मिला यांनी निवडणुकांच्या राजकारणातून संन्यास घेतला आणि मन:शांतीसाठी दक्षिण भारताची वाट धरली होती.