वेतनाच्या मुद्दय़ावरून गेल्या आठवडय़ात झालेल्या हिंसाचारानंतर विस्ट्रॉन कॉर्पोरेशन आणि अॅपल कंपनीने कामगारांच्या वेतनात अनियमितता, तसेच काही त्रुटी होत्या हे मान्य केले. या दोन्ही कंपन्यांनी शनिवारी याबाबत वेगवेगळी निवेदने जारी केली.
गेल्या आठवडय़ात वेतनावरून झालेल्या हिंसक घटनेनंतर अॅपल कंपनीने निवेदन जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘जे काही घडले ते खेदजनक असून, प्राथमिक चौकशीत उत्पादन पुरवठा आचारसंहितेतील काही बाबींचा भंग झाल्याचे दिसून आले आहे. त्यात कामाच्या तासांचे नियोजन योग्य प्रकारे करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. विस्ट्रॉन कंपनीला आता परिविक्षा प्रवर्गात टाकले असून त्यांना आमच्याकडून कुठलीही नवी कामे त्यांनी त्यांच्या बाजूने सुधारणा केल्याशिवाय दिली जाणार नाहीत’, असे अॅपल कंपनीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, विस्ट्रॉन कार्पोरेशन कंपनीने त्यांचे उद्योग नवप्रवर्तन विभागाचे उपाध्यक्ष व भारतातील कामकाजप्रमुख व्हिन्सेंट ली यांना पदावरून दूर केले आहे. ली हे तैवान येथे कार्यरत होते, बेंगळूरुत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी त्यांची या महिन्यात भेट घेतली होती.
प्रकरण काय?
बेंगळूरुच्या नरसापुरा येथील विस्ट्रॉन कंपनीत बारा हजार कर्मचारी सेवेस असून, तेथे आयफोनसह अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे सुटे भाग तयार केले जातात. वेतनाच्या मुद्दय़ावरून असंतुष्ट कामगारांनी आक्रमक होत गेल्या शनिवारी विस्ट्रॉनमध्ये हिंसाचार केला होता.
विस्ट्रॉनचे म्हणणे..
उद्योगाचे विस्तारीकरण करताना काही चुका झाल्या. कामगार संस्थांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे झाले नाही, वेतनातही सुधारणा करायला हव्या होत्या. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई म्हणून उपाध्यक्ष व्हिन्सेंट ली यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. अशा घटना परत घडू नयेत यासाठी कंपनीच्या पातळीवर बदल करण्यात येतील.
कामगार विभागाकडून चौकशी..
विस्ट्रॉन कंपनीने कामगार नियुक्ती व रोजगार याच्या नोंदी व्यवस्थित ठेवलेल्या नव्हत्या. वेतन व हजेरीचे तपशीलही योग्य नव्हते. कामगारांना एका पाळीत बारा तास कामाला लावले जात होते, असे कर्नाटक सरकारच्या कामगार विभागाने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 20, 2020 12:12 am