भारतात १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ प्रक्रियेला सुरुवात होणार असताना करोनाबाधित रुग्णसंख्या ३१ लाखांच्या पुढे गेली असून आतापर्यंत ५८ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांमुळे करोनाचा फैलाव होत असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

“बेजबाबदार, काळजी न घेणारे लोक जे मास्कचा वापर करत नाहीत त्यांच्यामुळेच भारतात करोना महामारीचा फैलाव होत आहे,” असं बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे. दरम्यान भारतातील रिकव्हरी रेट वाढला अशून ७५.९२ टक्के झाला आहे. गेल्या २५ दिवसांत १०० टक्क्यांहून अधिक प्रगती झाली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी यावेळी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “भारतातील रिकव्हरी रेट अॅक्टिव्ह केसेसच्या तुलनेत ३.४ टक्के जास्त आहे. एकूण केसेसच्या तुलनेत अॅक्टिव्ह केसेस २२.२ टक्के आहेत. तर रिकव्हरी रेट ७५ टक्के आहे”.

“भारतातील करोना मृत्यू दर १.५८ टक्के असून इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. गेल्या २४ तासात करोना रुग्णांच्या अॅक्टिव्ह केसेस ६४०० ने कमी झाल्या आहेत,” अशी माहिती राजेश भूषण यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “एकूण करोना रुग्णांच्या तुलनेत फक्त २.७ टक्के रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. १.९२ टक्के रुग्ण आयसीयूत आहेत. तर ०.२९ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत”.

बलराम भार्गव यांनी यावेळी करोना लसीसंबंधीही माहिती दिली. “तीन करोना लस सध्या स्पर्धेत पुढे आहेत. सिरम इन्सिट्यूटची लस दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहे. भारत बायोटेक आणि Zydus Cadila यांच्या लसीने पहिला टप्पा पार केला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.