काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे असे दाखवत कायमच शेतकऱ्यांचे प्रश्न समोर आणतात. राहुल गांधींनी एकदा तरी शेतात बैल जुंपले आहेत का? असा प्रश्न विचारत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. एवढंच नाही काँग्रेसच्या काळात युरिया मिळण्यासाठी शेतकऱ्यांना लाठीमार सहन करावा लागला हे विसरलात का? असाही प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केला आहे. बालाघाट या ठिकाणी अमित शाह यांची सभा झाली त्यावेळी त्यांनी राहुल गांधींवर टीका करत तुम्ही कधी शेतात बैल जुंपले आहेत का? असा प्रश्न विचारला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका असल्याने भाजपा आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. आता अमित शाह यांच्या टीकेला राहुल गांधी कसे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तीन दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मोदी फोबिया जडल्याची टीका अमित शाह यांनी मध्यप्रदेशातल्या सभेत केली होती. आज त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांना मोदींना देशातून हटवायचं आहे. त्यामुळे त्यांचे हे एकच लक्ष्य आहे असे दिसते आहे आम्हाला मात्र गरीबी, बेरोजगारी हटवायची आहे असे अमित शाह यांनी म्हटले होते.

या टीकेवर उत्तर देताना गीतेतले उदाहरण देऊन राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता आणि खुनाचे सूत्रधार पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असणे हे भाजपाच्या परंपरेला साजेसेच आहे असे ट्विट राहुल गांधींनी केले होते. आता पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधत शेतीतले तुम्हाला काय कळते तुम्ही बैल तरी कधी शेतात जुंपले आहेत का? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एवढा आवाज उठवत आहात मग काँग्रेसचे सरकार असताना शेतकऱ्यांना युरिया मिळण्यासाठी लाठ्या का खाव्या लागल्या असे प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केले.