पूर्व लडाख सीमेवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने मायक्रोवेव्ह वेपनचा वापर करुन भारतीय सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले, असे वृत्त काही ऑनलाइन वेबसाइटसवर प्रसिद्ध झाले होते. चीनकडून ही बातमी पसरवण्यात आली होती. लडाख सीमेवर असं काही घडलं नसल्याचं, भारतीय सैन्याने स्पष्ट केलं आहे. मायक्रोवेव्ह वेपनचा वापर झाल्याचं वृत्त संपूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे, असं भारतीय सैन्याने म्हटलं आहे.

“रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या भारतीय सैनिकांच्या ताब्यात असलेल्या दोन टेकडया चीनच्या पीएलएने मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये बदलल्या. २९ ऑगस्टला पीएलएने थेट एनर्जी वेपन डागले. त्यामुळे या दोन टेकडयांवर तैनात असलेल्या सैनिकांना उलटया सुरु झाल्या, त्यांना माघार घ्यावी लागली” असा दावा बीजिंगच्या रेन्मिन विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विषयाचे प्राध्यापक जिन कॅनराँग यांनी केला होता.

“मायक्रोवेव्ह वेपनचे वृत्त संपूर्णपणे खोटे, निराधार आणि हास्यास्पद आहे. मानसिक दबाव टाकण्याच्याच त्यांच्या रणनितीचा हा एक भाग आहे. आमच्या सैनिकांनी पँगाँग टीएसओच्या दक्षिणेकडील कैलाश रेंजमधील टेकडया ताब्यात घेतल्या, त्या धक्क्यातून अजूनही चिनी सैन्य सावरलेलं दिसत नाही” अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकाऱ्याने दिली.

पूर्व लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्य मागच्या सात महिन्यांपासून आमने-सामने आहे. दोन्ही बाजूचे ५० हजार सैनिक या भागात तैनात आहे. सुखोई या अत्याधुनिक फायटर जेटसह हॉवित्झर तोफा, रणगाडेही भारताने तैनात केले आहेत. या वादातून मार्ग काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत.

एनर्जी वेपन म्हणजे काय?
डायरेक्टेड एनर्जी वेपनमध्ये लेझर किरण आणि उच्च क्षमतेच्या स्क्षूम लहरींचा समावेश होतो. हे भविष्यातील युद्ध लढण्याचे तंत्रज्ञान आहे.ज्यामध्ये मिसाइल, फायटर विमान लेझर किरणं किंवा उच्च क्षमतेच्या स्क्षूम लहरींनी नष्ट करता येईल. अमेरिका, चीन आणि युरोपियन देश हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मोठया प्रमाणावर मेहनत घेत आहेत. भारतातही या कार्यक्रमावर काम सुरु आहे पण आता त्याची व्याप्ती आणखी वाढवण्यात येईल.

लडाख सीमेवर चीन बरोबर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर DEW प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे तसेच तो वेगाने पूर्ण करण्याची निकडही लक्षात आली आहे. डीआरडीओने आतापर्यंत ड्रोन विरोधी DEW सिस्टिम विकसित केली आहे. दोन किलोमीटरच्या रेंजमधील हवाई लक्ष्य भेदण्यासाठी हे १० किलोवॅटचे DEW मशीन सक्षम आहे. डीआरडीओने या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी सुद्धा करुन दाखवली आहे.