पंजाबचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यावरून भाजपाकडून अद्यापही काँग्रेसवर हल्लाबोल सुरुच आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना राहुल गांधी देशात समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत काय? असा सवाल केला आहे.


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला पाकिस्तानात गेल्यानंतर सिद्धू यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतली होती. त्यावरुन त्यांना देशांतर्गत मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. यावर प्रतिक्रिया देताना सिद्धू यांनी भारतीय संकुचित मनाचे असल्याची टिपण्णी केली होती. त्यांच्या या टिपण्णीचा आपण निषेध करतो, असे संबित पात्रा यांनी म्हटले आहे.

सिद्धू यांच्या या वक्तव्यावर मला त्यांच्याकडून नव्हे तर त्यांचे नेते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून उत्तर हवे आहे. राहुल गांधी देशात समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करताहेत का? असा सवालही पात्रा यांनी यावेळी केला. त्याचबरोबर काँग्रेससाठी आपले लष्कर प्रमुख ‘सडक के गुंडे’ तर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख ‘सोने दि मुंडे’ आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, शपथविधी कार्यक्रमामुळे मित्र असलेल्या सिद्धू यांना अनेक टीकेला सामोरे जावे लागल्याने खुद्द इम्रान खान यांनी ट्विटरवरुन त्यांची पाठराखण केली आहे. ते म्हणाले, नवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांततेचे प्रतीक आहेत. ते माझ्या शपथविधी सोहळ्याला आल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ते शांतीदूत आहेत, त्यांच्यावर जे भारतीय टीका करत आहेत त्यांनी ती करू नये. ते टीका करण्यात त्यांचा वेळ वाया घालवत आहेत. शांतता ही दोन्ही देशांसाठी महत्त्वाची आहे त्याशिवाय दोन्ही देश प्रगती साधू शकत नाहीत असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.