उत्तर नार्वेच्या समुद्रात मच्छीमारांना एक सफेद व्हेल मासा आढळला. त्याच्या गळयाभोवती हार्नेस म्हणजे पट्टयासारखे काहीतरी बांधण्यात आले होते. रशियाकडून या व्हेल माशाचा उपयोग हेरगिरीसाठी केला जात असल्याची दाट शक्यता आहे. रशियन नौदलाने या व्हेल माशाला प्रशिक्षित केले असावे अशी शक्यता नॉर्वेच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे.

या व्हेल माशाच्या गळयातील हार्नेस म्हणजे पट्टयावर ‘इक्युपमेंट ऑफ सेंट पीटसबर्ग’ असे लिहिलेले होते. या हार्नेसचा उपयोग कॅमेऱ्यासाठी किंवा अन्य उपकरणांसाठी केला जात असावा अशी शक्यता नॉर्वेच्या तज्ञांनी व्यक्त केली. नॉर्वेची सीमा रशियाला लागून आहे. फिनमार्कच्या समुद्रात मागच्या आठवडयात सर्वप्रथम हा व्हेल मासा दिसला होता. आम्ही समुद्रात जाळे टाकायला गेलो त्यावेळी दोन बोटींच्या मध्ये या व्हेल माशाला पाहिले होते असे २६ वर्षीय मच्छीमार जोअर हीस्टेन यांनी नॉर्वेच्या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

बऱ्याच काळापासून या व्हेल माशाच्या गळयात हार्नेस असेल तर ते त्याच्यासाठी चांगले नाही असे औडुन रिकार्डसन यांनी सांगितले. ते ट्रॉम्सो विद्यापीठात आर्क्टिक आणि समुद्री जीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत. रशियाने काही व्हेल मासे पाळल्याचे आपल्याला माहिती आहे. त्यातील काही व्हेल त्यांनी सोडले असावेत असे रिकार्डसन म्हणाले. शीत युद्ध, व्हिएतनाम आणि इराक युद्धाच्यावेळी अमेरिका आणि रशियाने समुद्री जीवांना हेरगिरीसाठी प्रशिक्षित केले होते. यामध्ये व्हेल, डॉलफिन, सी लायन्स, सील्स या माशांचा समावेश होतो.

अमेरिकेमध्ये अशा समुद्री जीवांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सुरु आहे. सॅन दिएगो, कॅलिफोर्निया या ठिकाणी समुद्री जीवांना शत्रूने परलेले समुद्री सुरुंग शोधण्याचे प्रशिक्षण दिले जाते. बंदरांची सुरक्षा आणि समुद्रातील संशयास्पद वस्तू शोधण्यासाठी हा कार्यक्रम सुरु आहे. रशियामध्ये सुद्धा लष्करी उद्देशांसाठी समुद्री जीवांना अशाच प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.