वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर वायएसआर काँग्रेसपक्ष भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. मागच्या आठवड्यात कृषी विधेयकाला विरोध करत, शिरोमणी अकाली दलाने भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला. शिरोमणी अकाली दल एनडीएचा जुना मित्रपक्ष होता.

मागच्यावर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने एनडीएची साथ सोडली होती. सोमवारी संध्याकाळी जगन मोहन रेड्डी दिल्लीला रवाना झाले. ते मंगळवारी सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. “पंतप्रधान वायएसआरसीपी पक्षाला एनडीएमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देऊ शकतात” असे पक्ष नेत्याने सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

मागच्या दोन आठवड्यातील जगन मोहन रेड्डी यांचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे. २२ सप्टेंबर रोजी जगन मोहन रेड्डी दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या दौऱ्यात राज्याच्या मुद्यांसह YSRCP च्या एनडीए समावेशाबद्दल प्राथमिक चर्चा झाल्याची शक्यता आहे. YSRCP चे लोकसभेत २२ खासदार असून राज्यसभेत सहा खासदार आहेत. मोदी सरकारमध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तेवर आल्यापासून जगन मोहन रेड्डी एनडीए सरकारबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राखून आहे.