इशरत जहाँ चकमकप्रकरणी गुप्तचर विभागाचे विशेष संचालक राजेंद्रकुमार यांच्या नावाचा उल्लेख पहिल्या आरोपपत्रामध्ये करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय गुप्तचर विभागाविरोधात येत्या ४ जुलै रोजी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) आरोपपत्र दाखल करण्यात येणार असून इशरत जहाँ आणि इतरांच्या कथित चकमकप्रकरणी कट-कारस्थानाचा अधिक बाजूने तपास करण्यासाठी सीबीआयला अधिक अवधी हवा आहे. ४ जुलै रोजी आरोपपत्र दाखल करण्यासंबंधी आम्ही गुजरात उच्च न्यायालयास आश्वासन दिले असून आम्ही त्या दिवशी प्राथमिक आरोपपत्र दाखल करणार आहोत, अशी माहिती सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांनी पत्रकारांना दिली.
या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी गुजरात उच्च न्यायालयाने सीबीआयवर सोपविली होती आणि या प्रकरणी आयपीएसच्या १९७९ च्या तुकडीतील अहमदाबादचे अधिकारी राजेंद्रकुमार यांना सीबीआयने संशयित म्हणून घोषित केले. या प्रकरणी फौजदारी कलम १७२ अन्वये कटाचा तपास करण्यासाठी सीबीआयला आणखी अवधी हवा आहे. याच संदर्भात राजेंद्रकुमार यांच्याविरोधात खटला दाखल करण्यासाठी सीबीआयला अनुमतीची आवश्यकता नसून वेळ पडल्यास त्यांना पुन्हा एकदा माहितीसाठी पाचारण करण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. राजेंद्रकुमार हे या महिन्याच्या ३१ तारखेस निवृत्त होत आहेत.