इशरत जहाँ चकमक प्रकरणातून गुजरातचे माजी पोलीस महासंचालक पी पी पांडे यांना विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी दोषमुक्त केले. पांडे हे सध्या जामिनावर बाहेर असून २०१३ मध्ये त्यांना सीबीआयने अटक केली होती.

मुंब्य्राला राहणाऱ्या इशरत जहाँ व जावेद शेखसह चौघांचा १५ जून २००४ रोजी अहमदाबादजवळ पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. हे चौघेही पाकिस्तानी नागरिक असून, दहशतवाद्यांशी त्यांचे संबंध होते, असा दावा पोलिसांनी केला होता. चकमक झाली त्यावेळी पांडे हे अहमदाबादच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त होते. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतच इशरत जहॉं आणि तिच्या साथीदारांना अहमदाबादच्या सीमेवर मारण्यात आले होते. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये पांडे यांच्यासह आयपीएस अधिकारी डी. जी. वंझारा, आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल, एन के अमिन, तरुण बरोत आणि अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश होता. अपहरण, हत्या, कट रचणे अशा विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जुलै २०१३ मध्ये पांडे यांना सीबीआयने अटक केली होती. जवळपास १९ महिने ते तुरुंगात होते. फेब्रुवारी २०१५ मध्ये ते जामिनावर गेल्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले. बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पांडे यांना दिलासा देत त्यांना दोषमुक्त केले. पांडे हे १९८० च्या बॅचमधील आयपीएस अधिकारी आहेत.