इशरत जहॉं कथित चकमक हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱयांनी मंगळवारी गुप्तचर विभागाचे (आयबी) विशेष संचालक राजेंद्र कुमार यांची चौकशी केली. इशरत जहॉं आणि अन्य चार जणांना मारण्यासाठी रचलेल्या कथित चकमकीत राजेंद्र कुमार यांचा संबंध होता का, याची माहिती घेण्यासाठी त्यांची सीबीआयकडून दुसऱयांदा चौकशी करण्यात आली. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱयांनी १५ जून २००४ रोजी इशरत जहॉंची कथित चकमकीमध्ये हत्या केली होती. गुजरात उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली सीबीआय या प्रकरणाचा तपास सध्या करीत आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी लष्करे तैय्यबाचे दहशतवादी अहमदाबादला येत आहेत, अशी माहिती राजेंद्र कुमार यांनी गुजरात पोलिसांना दिली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. चौकशीमध्ये राजेंद्र कुमार यांनी गुजरात पोलिसांना केवळ माहितीच दिली नाही, तर इशरत जहॉं कथित चकमक घडवून आणण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, अशी माहिती सीबीआयला मिळाली आहे.
गुजरात पोलिसांना आपण दिलेली माहिती योग्यच होती, असा दावा राजेंद्र कुमार यांनी केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुजरात पोलिसांना आपण माहिती दिली, म्हणजे त्यांना संबंधितांची हत्या करण्यास सांगितले, असा अर्थ होत नाही, असेही राजेंद्र कुमार यांनी म्हटले आहे.