इशरत जहाँ चकमक प्रकरणातील गहाळ कागदपत्रांची तपासणी करणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचे ‘कर्तृत्व’ समोर आले असून, बी. के प्रसाद असे नाव असलेल्या या अधिकाऱ्याने साक्षीदाराला केवळ त्याला कोणते प्रश्न विचारण्यात येणार याचीच माहिती दिलेली नसून, त्याची उत्तरे काय सांगायची, याचीही उजळणी करून घेतल्याचे समोर आले आहे. मी कोणतीही कागदपत्रे बघितलेलीच नाही, असे उत्तर देण्यास साक्षीदाराला शिकवण्यात आले होते. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त दिले आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेमध्ये १० मार्च रोजी घोषित केलेल्या चौकशी पथकाचे नेतृत्त्व करणाऱ्या अधिकाऱ्याच्या वर्तणुकीवरच या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इशरत जहाँ हिचे लष्करे तोयबाशी असलेल्या कथित संबंधांचा संदर्भ तपासातून काढून टाकून चकमकीत तिला ठार मारण्यात आल्याचा केंद्रीय अन्वेषण विभागाकडून तपास करण्याचा निर्णय तत्कालिन यूपीए सरकारने घेतला होता. यूपीए सरकारने कोणत्या परिस्थितीत हा निर्णय घेतला, याचा उलगडा करण्यासाठी सध्याच्या केंद्र सरकारने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

चौकशीनंतर प्रसाद यांनी आपला अहवाल बुधवारी गृह मंत्रालयाकडे सादर केला. पण त्यामध्ये गहाळ कागदपत्रांबाबत कोणताच उल्लेख करण्यात आलेला नाही. २५ एप्रिलला  ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या प्रतिनिधीने प्रसाद यांना वेगळ्या कारणासाठी फोन केला होता. प्रसाद यांच्याकडे अतिरिक्त सचिव (परदेशी नागरिक) या पदाचाही कार्यभार आहे. या फोनकॉलवेळी प्रसाद यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या प्रतिनिधीला काही मिनिटे फोन ‘होल्ड’ करण्याची विनंती केली होती. त्यावेळी प्रसाद यांचे दुसऱ्या फोनवर इशरत प्रकरणासंदर्भात अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू होते. हे संभाषणही ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या प्रतिनिधीचा फोन सुरू असल्यामुळे रेकॉर्ड झाले. मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद हे अशोक कुमार यांच्याशी बोलत असल्याची माहिती मिळाली आहे. अशोक कुमार हे १ मार्च २०११ ते २३ डिसेंबर २०११ या काळात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागात संचालक म्हणून कार्यरत होते. याच विभागाकडे इशरत जहाँचे प्रकरण होते.
त्यावेळी अशोक कुमार यांच्यासोबत या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना काय प्रश्न विचारण्यात येईल आणि त्याची काय उत्तरे द्यायची याची माहिती प्रसाद त्यांना देत होते. ‘आपने ये पेपर देखा’ असा प्रश्न विचारण्यात आल्यावर ‘मैने ये पेपर नहीं देखा’ असे उत्तर द्यायचे असेही त्यांना सांगण्यात आले होते.