भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या एका एजंटने इस्लामाबादमधील भारतीय दुतावासातील दोन अधिकाऱ्यांना धमकावल्याची घटना समोर आली आहे. ‘तुम्ही नीट वागा, आम्ही तुमची दोन विमानं पाडली आहेत’, अशी धमकी आयएसआय एजंटने दिली आहे. भारताने या प्रकरणी पाकिस्तानकडे निषेध नोंदवला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी इस्लामाबादमधील भारतीय दुतावासातील दोन अधिकारी भारतीय उच्चायुक्तांच्या कारमधून जात होते. यादरम्यान आयएसआयच्या एका एजंटने त्यांचा पाठलाग केला. त्याने भररस्त्यात भारतीय अधिकाऱ्यांची कार अडवली आणि त्यांना धमकावले. ‘आम्ही तुमची दोन विमानं पाडली. तरी देखील तुमच्या कारवाया सुरु आहेत. तुम्ही नीट वागा’, अशी धमकी त्या एजंटने दिली.

त्याच दिवशी अशा स्वरुपाच्या आणखी दोन घटना घडल्या. यातील एका घटनेत भारतीय दुतावासातील अधिकाऱ्याचा पाठलाग करुन त्याचे छायाचित्र काढले जात होते. तर दुसऱ्या घटनेत बाजारात जाण्यासाठी निघालेल्या दुतावासातील कर्मचाऱ्याचा एका दुचाकीस्वाराने पाठलाग केला. या तिन्ही घटनांमध्ये पाठलाग करणारी व्यक्ती ही आयएसआय एजंट असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. भारताने या तिन्ही घटनांची दखल घेतली असून परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवून घटनेचा निषेध केला आहे.